Breaking News

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचालित पायोनियर पब्लिक स्कूलला जिल्हास्तरीय 'आदर्श शाळा पुरस्कार'


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क

खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचालित पायोनियर पब्लिक स्कूलला एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा 'जिल्हास्तरीय आदर्श शाळा पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले. सांगोला येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.

हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. सचिन जगताप यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल येलपले सर, संस्थेचे सचिवा मनीषा येलपले मॅडम ,  पायोनियर पब्लिक स्कूलचे प्राचार्य मा. सतीश देवमारे सर, पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य मा. सोमनाथ आदलिंगे सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने केलेल्या गुणात्मक, नाविन्यपूर्ण व आदर्श कार्याची दखल घेत हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. विद्यार्थीकेंद्रित अध्यापन पद्धती, दर्जेदार शैक्षणिक नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या शाळेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा हा गौरव मानला जात आहे. हा पुरस्कार संस्थेच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या सामूहिक परिश्रमांची पोचपावती असून भविष्यातही अधिक उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

या सोहळ्यासाठी सांगोला विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. ॲड. शहाजी बापू पाटील, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे प्रमुख दावेदार मा. मंगेश चिवटे साहेब, योगेश दादा खटकाळे, सागर पाटील, जिल्हा परिषद सदस्य मा. दादा लवटे साहेब, सांगोला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष मा. आनंद भाऊ माने साहेब तसेच सभापती मा. अजय सरगर साहेब यांच्यासह परिसरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विविध शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उल्लेखनीय यशाबद्दल पायोनियर पब्लिक स्कूलचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत