अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे ८०वा भारतीय स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
अजनाळे : अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे ८०वा भारतीय स्वातंत्र्यदिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्रांगणात आयोजित मुख्य कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता चौथीतील २०२६ ची शिष्यवृत्तीधारक कु. श्रुतिका येलपले व तिचे पालक दत्तात्रय येलपले व रुपाली येलपले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे होते.
यावेळी मा. लक्ष्मण येलपले, मा. पांडुरंग कुरे, मा. सागर चौगुले, मा. उत्तम विटेकर, मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून थोर स्वातंत्र्यसैनिकांच्या त्याग, बलिदान व संघर्षाचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण करून देत “आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य दिले, तुम्ही भारताला काय दिले?” तसेच “ना जातीसाठी लढले, ना पातीसाठी लढले; ते फक्त देशासाठी लढले” अशा प्रभावी विचारांतून आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर उत्कृष्ट संगीत कवायत सादर केली. विविध देशभक्तीपर गीतांवर आधारित अप्रतिम लेझीम नृत्य सादर करून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. तसेच संघभावना, प्रसंगावधान आणि देशभक्ती यांचा सुंदर मिलाप दर्शविणारे प्रभावी पिरॅमिड प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले. मुख्याध्यापिका गिड्डे मॅडम यांनी “देशाची खरी प्रगती शाळेच्या वर्गखोल्यांमधून सुरू होते” या विचारावर आधारित विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे मा. लक्ष्मण येलपले यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास, संस्कृती आणि उज्ज्वल भविष्याचे महत्त्व समजावून सांगत मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सहशिक्षिका काजल भंडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे हा संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत