Breaking News

अजनाळे नगरी सज्ज! अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी सुरू भव्य मंडप उभारणीचे काम युद्धपातळीवर; हरिनामाच्या गजरासाठी वारकरी-भाविकांच्या स्वागताची लगबग


 अजनाळे सचिन धांडोरे 

श्री गोकुळाष्टमी उत्सव व संत ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त अजनाळे (ता. सांगोला) येथे आयोजित करण्यात आलेल्या २४ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. सप्ताहाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने अजनाळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, आयोजक आणि कार्यकर्ते तयारीच्या कामात व्यस्त झाले आहेत.

वारकरी आणि भाविकांच्या स्वागतासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मंडप परिसरात दिवसभर लगबग पाहायला मिळत आहे. भाविकांना कीर्तन, हरिपाठ, भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी आवश्यक बैठक व्यवस्था व इतर सुविधांची तयारीही वेगाने केली जात आहे.

२९ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या या सप्ताहात काकडा आरती, ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन आणि जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांची पर्वणी भाविकांना मिळणार आहे. नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमुळे यंदाच्या सप्ताहाकडे परिसरातील वारकरी संप्रदायाचे विशेष लक्ष लागले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि हरिनामाचा जागर करणाऱ्या या सप्ताहासाठी अजनाळे गाव सज्ज होत असून, मंडप उभारणीपासून स्वच्छता, विद्युत व्यवस्था आणि भाविकांच्या सोयी-सुविधांपर्यंतची कामे वेगाने सुरू आहेत. सप्ताहाच्या निमित्ताने गावातील वातावरण भक्तीमय होण्यास सुरुवात झाली आहे.

अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने अजनाळे येथे राज्यातील विविध भागांतून वारकरी व भाविकांची उपस्थिती राहण्याची शक्यता असून, त्यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांकडून उत्साहाने तयारी केली जात आहे. कीर्तनाचा रंग, हरिपाठाचा गजर, ज्ञानेश्वरी पारायणाची भक्ती आणि हरिनामाचा जयघोष यामुळे अजनाळे नगरीत लवकरच भक्तीचा महासोहळा रंगणार आहे.

या सप्ताहातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी अजनाळे व परिसरातील वारकरी, भाविक आणि भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत