Breaking News

मैत्री शाळेतील बाकावरची... आठवणींच्या नात्यांची! 'टीम गोल्डन 98-99' : 26 वर्षांनंतरही तितकीच जिवंत असलेली मैत्री


 

काही प्रवास कधीच संपत नाहीत. ते काळाच्या ओघात फक्त आठवणी बनतात आणि त्या आठवणी पुन्हा भेटल्या की आयुष्य पुन्हा एकदा बालपणाच्या अंगणात धावत जाते. विकास विद्यालय, अजनाळे (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील इयत्ता दहावी 1998-99 च्या बॅचची कहाणीही अशीच आहे.
1999... एका सहस्त्रकाचा शेवट आणि नव्या युगाची सुरुवात! बोर्डाचा शेवटचा पेपर संपला आणि प्रत्येकाने आयुष्याच्या वेगळ्या वाटा धरल्या. त्या दिवशी निरोप घेताना पुन्हा कधी भेटू, याची कल्पनाही नव्हती. पण काळाने मैत्रीचे धागे कधीच तुटू दिले नाहीत.
त्या काळात ना मोबाईल होते, ना इंटरनेट. तरीही आनंद अफाट होता. जेवणाच्या सुट्टीत सर्व मित्र-मैत्रिणी गोल बसायचे. कुणाच्या रुमालात भाकरी-चटणी, कुणाकडे भाजी, तर कुणाकडे लोणचे असायचे. प्रत्येक घास वाटून खाल्ला जायचा. त्या साध्या डब्यात प्रेम, आपुलकी आणि मैत्रीचा खरा स्वाद दडलेला होता.

खेळाच्या मैदानावर खो-खो, कबड्डी, धावण्याच्या स्पर्धा आणि वर्गात शिक्षकांचे संस्कार... हीच आमची खरी संपत्ती होती. बोर्डाच्या परीक्षेपूर्वी सुरू होणारी नाईट स्टडी, चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास, पहाटे अभ्यासाच्या नावाखाली डुलक्या घेणारे मित्र आणि शिक्षकांचा प्रेमळ धाक—या आठवणी आजही तितक्याच जिवंत आहेत.
18 जानेवारी 2015 रोजी 'टीम गोल्डन 98-99' या व्हॉट्सअॅप समूहाची स्थापना झाली आणि हरवलेले मित्र पुन्हा एकत्र आले. एकेक मोबाईल क्रमांक शोधत मैत्रीचा धागा पुन्हा विणला गेला. त्या दिवसापासून आजपर्यंत हा समूह केवळ सोशल मीडियावरचा ग्रुप नसून एका मोठ्या कुटुंबात रूपांतरित झाला आहे.
आज या बॅचमधील विद्यार्थी भारतीय सैन्यदल, महाराष्ट्र पोलीस, रेल्वे पोलीस, आयटी, उद्योग, शेती, व्यापार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. सर्व मित्र निर्व्यसनी, कर्तृत्ववान आणि समाजाभिमुख आहेत, तर सर्व महिला सुशिक्षित गृहिणी म्हणून आपल्या कुटुंबाचा आधार आहेत.
2017 मध्ये पहिला स्नेहमेळावा झाला आणि त्यानंतर दरवर्षी भेटण्याची परंपरा सुरू झाली. 2024 मध्ये रौप्यमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विशेष म्हणजे, बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्यासाठी लेमन गोळ्या, पेपरमिंट, खारी बिस्किटे यांसारखे त्या काळातील आवडते खाऊ ठेवण्यात आले होते. क्षणभर प्रत्येकाला वाटले—काळ पुन्हा 1999 मध्ये परतला आहे.


आजही जेव्हा सर्व मित्र भेटतात, तेव्हा पद, पैसा, प्रतिष्ठा किंवा व्यवसाय यापैकी काहीच महत्त्वाचे राहत नाही. प्रत्येक जण पुन्हा तोच शाळकरी मुलगा किंवा मुलगी बनतो. कारण खरी मैत्री ही वय, वेळ आणि अंतर यापलीकडे जगत असते.
"शाळा संपली, वर्ग बदलले, आयुष्य पुढे सरकले... पण शाळेतील बाकावर जुळलेली मैत्री आजही मनाच्या पहिल्या बाकावर तितक्याच प्रेमाने बसलेली आहे."
'टीम गोल्डन 98-99' ही केवळ एका बॅचची ओळख नाही; तर मैत्री, संस्कार, आपुलकी आणि अविस्मरणीय आठवणींचा जपलेला अमूल्य वारसा आहे.

   
     संकलन: जनार्धन येलपले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत