मॉडीफाईड सायलेन्सर व विनानंबर प्लेट वाहनांवर मंगळवेढा पोलिसांचा विशेष ड्राईव्ह; ११ वाहनांवर कारवाई
मंगळवेढा विशेष प्रतिनिधी : येताळा खरबडे
शहरातील ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्याबरोबरच वाहतूक नियमांचे प्रभावीपणे पालन व्हावे, या उद्देशाने मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वाहतूक विभागामार्फत मॉडीफाईड सायलेन्सर व विनानंबर प्लेट वाहनांविरोधात विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम मंगळवेढा उपविभागाचे डीवायएसपी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या सूचनेनुसार व मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या विशेष ड्राईव्हअंतर्गत शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे व मुख्य रस्त्यांवर वाहनांची तपासणी करण्यात आली. नियमबाह्य पद्धतीने मॉडीफाईड सायलेन्सर बसवून मोठा आवाज करणारी तसेच विनानंबर प्लेट फिरणारी वाहने शोधून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मोहिमेदरम्यान एकूण ११ वाहनांचे मॉडीफाईड सायलेन्सर जप्त करण्यात आले. संबंधित वाहनचालकांवर ई-चलन मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरिगिड्डे यांनी वाहनचालकांचे समुपदेशन करून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मॉडीफाईड सायलेन्सरमुळे निर्माण होणारे ध्वनीप्रदूषण, नागरिकांना होणारा त्रास तसेच सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक वाहनावर नियमानुसार नंबर प्लेट असणे बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मंगळवेढा पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या विशेष मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुकीस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
या कारवाईत एपीआय लातूरकर, एपीआय ढेरे, पीएसआय बनकर, पीएसआय पिसे, पोलीस हवालदार यादव तसेच पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत