Breaking News

शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा; वंचित बहुजन आघाडीची प्रशासनाकडे मागणी


 मंगळवेढा विशेष प्रतिनिधी : येताळा खरबडे 

तालुक्यातील 183 शाळांमध्ये तब्बल 78 शिक्षकांची पदे रिक्त असताना कार्यरत 101 शिक्षकांची मतदार पुनर्रचना (एसआरआय) सर्वेक्षणासाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने शिक्षण व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत शिक्षकांना बीएलओच्या कामातून तात्काळ मुक्त करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी बी. आर. माळी आणि तहसीलदार यांना शहराध्यक्ष अजय गाडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात आधीच 78 शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यातच कार्यरत 101 शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्त केल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण झाले असून शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.

वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे शिक्षकांच्या जागी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. सध्या ज्या विभागांमध्ये नियमित कामाचा ताण कमी आहे, त्या विभागांतील कर्मचारी किंवा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची या कामासाठी नियुक्ती करावी. त्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी व अनुभव मिळेल, तसेच शिक्षक पूर्णवेळ विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी उपलब्ध राहतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष दिपसागर पाराध्ये, युवा जिल्हा महासचिव सोमनाथ ढावरे, जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, तालुकाध्यक्ष अशोक माने, शहराध्यक्ष अजय गाडे, लखन शीकतोडे, अजित खंदारे, किशोर कसबे आणि वि. ना. शिवशरण गुरुजी आदींच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.

यावेळी शहराध्यक्ष अजय गाडे म्हणाले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणरूपी हे दूधच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करून शिक्षणाला प्राधान्य द्यावे."


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत