शुक्रवार दि. पाच डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहणार..! प्राथमिक - माध्यमिक शिक्षक संघटना एकवटल्या !
सांगोला प्रतिनिधी
टीईटी अनिवार्यता , नवीन संच मान्यतेचे जाचक निकष यामुळे शाळा बंद होण्याचा निर्माण झालेला धोका, रोखण्यात आलेली पदोन्नती प्रक्रिया, कंत्राटी कर्मचारी भरतीचे धोरण यामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. या असंतोषाला वाट करुन देण्यासाठी शुक्रवार दि. पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली असून या आंदोलनात राज्यातील पस्तीस शिक्षक संघटना एकवटल्या असून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दु. 1 वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
दि. १ सप्टेंबर रोजी टीईटी अनिवार्यतेच्या संबंधाने सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अनेकविध पद्धतीने संघटनांकडून शिक्षकांच्या सेवेला संरक्षण मिळावे यासाठी राज्य शासनाला साकडे घालण्यात आले होते. देशातील अनेक राज्य सरकारांनी याबाबतीत पुनर्विचार याचिका दाखल केल्या असून काही राज्यांनी केंद्र शासनाकडे शिक्षकांच्या संरक्षणार्थ अनुकूल प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र राज्य सरकारने याबाबतीत साफ दुर्लक्ष केले आहे. केंद्र शासनाने आर.टी.ई. कलम 23 तसेच NCTE अधिसूचनेत दुरुस्ती करावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव सादर करावा या प्रमुख मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षण क्षेत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी काम करणाऱ्या 35 संघटना सहभागी झालेल्या असून पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनाची नोटीस राज्य शासनाला दि. 17 नोव्हेंबर रोजी देण्यात आली आहे. संच मान्यता निकषांमुळे शाळा व शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले असून या निकषांत बदल करावेत, टीईटी अनिवार्यतेमुळे थांबलेली पदोन्नती प्रक्रिया सुरु करावी, मूळची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षण सेवक योजना रद्द करावी, मुख्यालयी वास्तव्याची अट शिथिल करावी, सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा, शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रक्रिया सुरु करावी, अशैक्षणिक कामे व अनाठायी उपक्रम बंद करावीत, न.पा. /मनपा शिक्षकांच्या वेतनासाठी स्वतंत्र वेतनपथक गठीत करण्यात यावे, वस्ती शाळा शिक्षकांची सेवा त्यांच्या मूळ नियुक्ती दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी, आश्रमशाळेतील कंत्राटी शिक्षक भरती रद्द करावी अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे मांडण्यात येणार आहेत.
या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक सभा, शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघटना , शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, स्वराज शिक्षक संघटना, अल्पसंख्यांक अधिकारी कर्मचारी संघटना सहभागी झालेल्या आहेत. तर माध्यमिक शिक्षकांच्या टीडीएफ, मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक कृती समिती , अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ , एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, पी.डी.एस.पी , युवक कर्मचारी शिक्षक संघटना,शिक्षक सेना ,अ.भा. उर्दू शिक्षक संघटना इत्यादी सर्व संघटनांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने देखील शाळा बंद आंदोलन व भव्य मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्व संस्था चालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत