शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कांसाठी जिल्हा परिषदेने तरतूद करावी..! जिल्हा शिक्षक समितीची मागणी.. !
सोलापूर (दि. २६ ) शालेय जीवनातील शैक्षणिक गुणवत्तेचा मापदंड मानली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा इयत्ता चौथी , पाचवी व सातवी, आठवी अशा चार वर्गांसाठी घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे कोलमडून पडले आहे. अशा स्थितीत चारही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी जिल्हा परिषद सेस निधीतून तरतूद करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी जिल्हा शिक्षक समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी
झालेल्या चर्चेत पूरबाधित शाळांचे झालेले नुकसान विचारात घेऊन त्या शाळांना सुविधा द्याव्यात, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख पदोन्नती प्रक्रिया राबवावी ,पदवीधर शिक्षकांच्या वेतनत्रुटी दूर कराव्यात,
तालुका अंतर्गत समायोजन प्रक्रियेतील तक्रारची चौकशी करावी , पात्र विषय शिक्षकांना वेतनश्रेणीचा लाभ द्यावा , रखडलेल्या निवड श्रेणी प्रस्तावांना मंजुरी द्यावी ,जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करावा , भविष्य निर्वाह निधी आर्थिक हिशोबाच्या स्लिप उपलब्ध करुन द्याव्यात , विषय शिक्षक नकार मंजुरीसाठी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजूर करुन संबंधित शिक्षकांना तत्काळ पदस्थापना द्यावी इत्यादी विषयांवर यावेळी सखोल चर्चा झाली.
या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अनुकूल कार्यवाही लवकरच करण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार, दयानंद कवडे, पुणे विभागीय उपाध्यक्ष मो. बा. शेख, विभागीय अध्यक्ष अन्वर मकानदार, ज्येष्ठ नेते पंडित कोरे, अस्लम इनामदार, दक्षिण सोलापूर शाखेचे अध्यक्ष शेखलाल शेख, मंगळवेढा शाखेचे अध्यक्ष विठ्ठल ताटे, मोहोळ शाखेचे अध्यक्ष चरण शेळके, सुशील पारडे, अमोल बोराळे, दादासाहेब भगरे, यशवंत अंबीगेर, प्रकाश धुरपे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत