Breaking News

जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतून जत्तीवस्ती संख शाळेला मिळाले दुसरे हक्काचे शिक्षक..! माळी सरांच्या रूपाने जत्तीवस्ती शाळेचे गतवैभव परत मिळाल्याची भावना


 सांगोला प्रतिनिधी 

       राज्यभरात शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सुरू असताना जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेतून जत्तीवस्ती संख शाळेमध्ये लक्ष्मण माळी सर हजर झाले. संख मराठी या शाळेतून लक्ष्मण माळी कार्यमुक्त होऊन जत्तीवस्ती संख शाळेत रुजू झाले. गेले वर्षभर शाळा एक शिक्षकी होती. जून 2024 मध्ये शाळेमध्ये पवित्र पोर्टल मधून नवनियुक्त शिक्षक म्हणून प्रणवराज शेटे हजर झाले होते. नवखे शिक्षक असल्याने व चळवळीतून पुढे आल्याने व समाज घटकांशी मिळून मिसळून काम करण्याची शैली यातून वर्षभरामध्ये शाळेमध्ये अनेक यशस्वी बदल करण्यात आले होते. शाळेचा पट हे खऱ्या अर्थाने आव्हान होते व ते आव्हान पेलून शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने व सर्व पालकांच्या सहकार्याने शाळेचा पट वर्षभरामध्येच डबल केल्यामुळे शाळेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू होती. शाळेमध्ये अनेक नानाविध उपक्रम वेळोवेळी साजरे केले जातात तसेच गुणवत्तेच्या बाबतीत ही शाळेची प्रगती उल्लेखनीय आहे.

        गुणवत्तेमुळे व शाळेच्या यशस्वी वाटचालीमुळे शाळा नावारूपास येत होती याचेच फलित म्हणून शाळेचा पट आठ वरून 24 पर्यंत मजल मारता आली. त्यामुळे शाळेमध्ये आणखी एक शिक्षकाचे पद रिक्त होते. बदली प्रक्रियेतून लक्ष्मण माळी सर हजर झाल्याने जत्तीवस्ती संख शाळेला दुसरे हक्काचे शिक्षक मिळाले, तसेच जत्तीवस्ती शाळेचे गत वैभव पुनश्च प्राप्त झाल्याची भावना सर्व पालकांमध्ये व उपस्थितांमध्ये होती. यावेळी लक्ष्मण माळी यांचा सत्कार शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन शाळा व्यवस्थापन समितीमार्फत करण्यात आला. लक्ष्मण माळी यांना प्रदीर्घ सेवेचा अनुभव असून मी आता राहिलेली संपूर्ण माझी जबाबदारी व कर्तव्य याच शाळेत निभावून याच शाळेतून सेवानिवृत्त होऊ इच्छितो असेही उद्गार याप्रसंगी लक्ष्मण माळी यांनी काढले. माळी सरांच्या आगमनाने मुलांमध्ये देखील नवीन ऊर्जा व चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलेले चित्र पाहायला मिळाले. यापूर्वी रथाला एकच चाक होते परंतु आता माळी सरांच्या आगमनाने जत्तीवस्ती संख शाळेचा गौरव रथ दुहेरी चाकांमुळे नक्कीच गुणवत्तेच्या व यशस्वीतेच्या नवीन शिखरावर स्वार होईल व ही शाळेची संपूर्ण वाटचाल जतचे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी राम फरकांडे साहेब, विस्ताराधिकारी अन्सार शेख साहेब, संख केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख कट्टीमनी सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने होत असल्याचे मत यावेळी शिक्षक प्रणवराज शेटे यांनी मांडले.  यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जत्ती, राहुल फुटाणे, अप्पा राय पाटील, आप्पासाहेब जत्ती, राजू मामा बगली, संगण्णा बगली, दत्ता जाधव, अंगणवाडी सेविका कांबळे, मदतनीस जाधव व सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत