शक्तीपीठ रद्द करा... - नाझरे, वझरे येथील शेतकऱ्याची एक मुखी मागणी..
नाझरे प्रतिनिधी
नाझरे, वझरे ता. सांगोला येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची बैठक नाझरे येथील खंडोबा मंदिर वझरे येथील अंबाबाई मंदिर येथे संपन्न झाली व यामध्ये एकच जिद्द शक्तिपीठ रद्द अशा घोषणा देऊन, शक्तीपीठ रद्द करा अशी एक मुखी मागणी करण्यात आली.
शक्तीपीठ महामार्गासाठी येथील कसदार जमिनी जाणार आहेत व जमिन आमची आई आहे व आईस आम्ही विकणार नाही तसेच यावर आमची रोजी रोटी आहे, जमिनी देऊन आम्ही खायचे काय असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहे व शक्तिपीठासाठी नाझरे येथून चार किमी अंतरावर समांतर रोड असताना हा नवीन रोड काढून ठेकेदारांना जगण्याचा महाराष्ट्र शासनाचा हेतू चांगला नाही व या अगोदरच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी रोड होणार नाही असे सांगितले परंतु सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी व शासनाने शेतकऱ्यांचा विरोध असताना हा मार्ग रेटण्याची गरज काय आहे व यासाठी मोजणी येणाऱ्या अधिकाऱ्याला आम्ही येऊ देणार नाही व मोजू देणार नाही असा ठराव बैठकीत करण्यात आला.
यावेळी डॉक्टर सोनवणे, शिक्षक नेते दादासो वाघमोडे, हरिश्चंद्र बनसोडे, दत्तात्रय पाटील, गंगाधर जोंधळे, रविराज शेटे व माजी सरपंच विजयकुमार देशमुख, राजू पाटील, दत्ता देशपांडे भारत बनसोडे यांनी हा मार्ग सरकारने रद्द करावा असे यावेळी सांगितले.
तसेच हजारो एकर सुपीक जमिनी, विहिरी, पाईपलाईन, बोरवेल, फळबागा, घरे, बंगले यांना फटका बसणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा व शक्तिपीठ रद्द करावा तसेच शेतकऱ्यांना भूमिहीन करू नका व कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ होऊ देणार नाही असा पवित्रा नाझरे व वजरे येथील शेतकऱ्यांनी घेतला आहे. यावेळी बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत