उंबरे पागे येथे संविधान अमृत महोत्सवानिमित्त वैचारिक मंथन आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
पंढरपूर :
मौजे उंबरे पागे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथे संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त एक भव्य वैचारिक मंथन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे हा सत्कार महात्मा फुलेंच्या पारंपरिक पोशाखात करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी संविधान मूल्यांवर आधारित समाज घडवण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. क्रांतिकारक विचारसरणी आणि सामाजिक समतेचा मूलमंत्र देणाऱ्या महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. गावातील मान्यवर ज्येष्ठ नागरिकांचा गौरव हा उंबरे पागे गावाचे स्वर्गीय सुपुत्र धनाजी शिवपालक यांच्या स्वप्नपूर्तीचा एक भाग होता. त्यांची इच्छा होती की गावातील ज्येष्ठांचा सन्मान महात्मा फुलेंच्या वेशात व्हावा, ही बाब आज त्यांच्या पश्चात पूर्णत्वास गेली. त्यांच्या प्रेरणेतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम यशस्वी केला. कार्यक्रमास गावकऱ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. नवतरुणांमध्ये संविधान, समता, आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांबद्दल नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले. उंबरे पागे गावाने एक आदर्श उदाहरण समाजापुढे ठेवत फुले-आंबेडकरी विचारांचे वारस म्हणून आपली ओळख अधोरेखित केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत