Breaking News

घरकुल धारकांना तात्काळ वाळू मोफत द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू – नितीन भाऊ रणदिवे यांचा इशारा...! लवकरच महसूल मंत्री महोदयांची भेट घेणार..!


 

सांगोला (प्रतिनिधी):

 सांगोला तालुक्यातील घरकुल धारकांना शासनाच्या आदेशानुसार पाच ब्रास वाळू मोफत मिळावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी लहुजी पॅंथर सेनेच्यावतीने दिनांक १२ मार्च २०२५ रोजी भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला प्रशासन आणि सरकारने गांभीर्याने घेतल्याचे संकेत मिळाले होते आणि महसूल विभागास घरकुल धारकांना मोफत वाळू देण्याचे स्पष्ट आदेश देखील देण्यात आले होते.

परंतु या आदेशांना आता दीड महिना उलटून गेला असतानाही सांगोला तालुक्यातील अनेक घरकुल लाभार्थींना अजूनही वाळू मिळालेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि महसूल प्रशासन यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लहुजी पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ रणदिवे यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाला आता शेवटचा इशारा दिला आहे. "सरकारने आम्हाला दिलेला वचनभंग करत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. घरकुलसाठी मिळालेला निधी खर्च करूनही जर वाळूसारख्या मूलभूत बाबीसाठी लोकांना झगडावे लागत असेल, तर हा अन्याय असून तो सहन केला जाणार नाही," असे रणदिवे यांनी ठामपणे सांगितले.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, महसूल विभागाने तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लहुजी पॅंथर सेना रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल. “मी लवकरच महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्या समोर मांडणार असून, जर अजूनही दुर्लक्ष केले गेले, तर जनता रस्त्यावर उतरेल आणि आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर मागेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सांगोला तालुक्यातील हजारो घरकुल धारक अजूनही वाळूसाठी प्रतीक्षेत असून, शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी रणदिवे यांचा हा इशारा प्रशासनासाठी गंभीर संकेत मानला जात आहे.

आता प्रशासन आणि महसूल विभाग यावर किती तातडीने पावले उचलतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत