खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित' पायोनियर इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा.
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
य. मंगेवाडी : शिक्षकांच्या ज्ञान, त्याग, समर्पण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे शिक्षक दिन. भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी खंडोबा बहुउद्देशीय संस्था, पायोनियर इन्स्टिट्यूटच्या पायोनियर शैक्षणिक संकुलात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पायोनियर शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष मा. अनिल येलपले सर, संस्थेच्या सचिव सौ. मनीषा येलपले मॅडम, पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूल व पायोनियर पब्लिक स्कूल (सीबीएसई) चे प्राचार्य मा. सतीश देवमारे सर तसेच पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य मा. सोमनाथ आदलिंगे सर यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी प्रतीक्षा अलदर, सिमरन येलपले व नेहा मासाळ यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण व प्रभावी पद्धतीने केले.
शिक्षक दिनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे ‘एक दिवस विद्यार्थी शिक्षक’ हा अभिनव उपक्रम. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी एक दिवस शिक्षकांची भूमिका स्वीकारत विविध वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन केले. वर्गाचे नियोजन, विषयाचे स्पष्टीकरण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच शिस्त राखण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पार पाडली.
यावेळी यश येलपले यांनी पायोनियर शैक्षणिक संकुलाच्या संस्थापक अध्यक्षांची, समृद्धी येलपले यांनी संस्थेच्या सचिवपदाची, ओम लोहार यांनी पायोनियर इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्यपदाची, तर सक्षम माने यांनी पायोनियर निवासी गुरुकुलच्या प्राचार्यपदाची भूमिका यशस्वीपणे पार पाडली.
इयत्ता दहावीच्या इतर विद्यार्थ्यांनीही विविध वर्गांमध्ये जाऊन विषयांचे ज्ञान देतानाच शिस्त, वेळेचे नियोजन, अभ्यासातील सातत्य, संस्कार व जीवनमूल्ये याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांची भूमिका साकारताना विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्यामागील मेहनत, संयम, जबाबदारी आणि समर्पण यांचा प्रत्यक्ष अनुभव आला.
या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, वक्तृत्वकौशल्य, जबाबदारीची जाणीव आणि अध्यापन कौशल्य विकसित होण्यास मोठी मदत झाली. शिक्षक दिनाचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा, आनंददायी आणि संस्मरणीय अनुभव ठरला.
“शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तर विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारा शिल्पकार असतो,” याची जाणीव विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका साकारत ज्ञानदानाचा अनुभव घेतला आणि शिक्षकांच्या कार्याबद्दलचा आदर अधिक दृढ केला.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे संपूर्ण पायोनियर शैक्षणिक संकुलात ज्ञान, संस्कार, नेतृत्व आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. “आज विद्यार्थी शिक्षक झाले आणि शिक्षकांच्या भूमिकेतून जीवनाचा एक नवा धडा शिकले,” अशा अविस्मरणीय वातावरणात शिक्षक दिनाची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत