अभिनव पब्लिक स्कूलमध्ये पालक सभा उत्साहात संपन्न
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे प्राथमिक विभागाची विद्यार्थ्यांसाठी पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पालक सभेची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रतिमेचे पूजन पालक हणमंत नरळे, लक्ष्मण येलपले, संदीप कुरे व संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रथम घटक चाचणीचे विश्लेषण, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, वर्तन व शिस्त, घरच्या अभ्यासाचे नियोजन, वाचनाची सवय, CBSE अभ्यासक्रम, शिक्षक-पालक संवाद, सहशालेय उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत आवश्यक सूचना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पालकांना मार्गदर्शन करताना सहशिक्षिका सुरेखा येलपले यांनी 'निरोगी शरीरात निरोगी मन राहते' या उक्तीचा दाखला देत मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी त्यांच्या पोषणमूल्ययुक्त आहाराकडे पालकांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन केले. तसेच मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे यांनी शाळेचे संपूर्ण वार्षिक नियोजन,सहशालेय उपक्रम शालाबाह्य स्पर्धा परीक्षा यांची माहिती देत,मुलांच्या जडणघडणीत शाळेइतकेच पालकांचे योगदानही महत्त्वाचे असते हे सांगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेच्या वतीने सातत्यपूर्ण प्रयत्न केले जातील हे आश्वासन दिले. लक्ष्मण येलपले यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांची भूमिका याबाबत मार्गदर्शन केले.
पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या पाल्याच्या प्रगतीबाबत शिक्षकांशी संवाद साधला. शाळा आणि पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका सीमा कदम यांनी केले.
पालक सभेनंतर विद्यार्थ्यांच्या प्रथम घटक चाचणीचा निकाल दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. पालकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शाळेकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत