सर्वसाधारण परिस्थितीवर मात करत सानिया काझी ची यशस्वी भरारी..! वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी MPSC मधून सहाय्यक महसूल अधिकारीपदी निवड..
विशेष प्रतिनिधी : हुसेन मुलाणी
नातेपुते, ता. माळशिरस : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर नातेपुते येथील सानिया मिनाज काझी हिने वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन करून सहाय्यक महसूल अधिकारी पदावर निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे नातेपुते परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सानियाचे पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण दाते प्रशाला, नातेपुते येथे झाले. त्यानंतर तिने सायन्स शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असतानाच प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने MPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कोणत्याही मोठ्या सुविधा किंवा विशेष पार्श्वभूमीचा आधार नसताना सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि ध्येयावर असलेला विश्वास यामुळे तिने हे यश मिळवले.
सानियाचे आजोबा दस्तगीर मौला काझी हे शेती व्यवसाय करतात. वडील मिनाज दस्तगीर काझी हे इंडस टॉवर लिमिटेडमध्ये खासगी नोकरी करतात, तर आई मुमताज मिनाज काझी या गृहिणी आहेत. मोठी बहीण सिमरन विवाहित असून लहान भाऊ अमन BSNLमध्ये नोकरी करतो.
कुटुंबाची सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असतानाही सानियाने परिस्थितीला दोष न देता आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले. तिच्या यशातून “परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते” हा प्रेरणादायी संदेश तरुणाईला मिळाला आहे.
सानियाच्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेपुते परिसरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन करण्यात येत असून, तिची यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत