लामजेवाडी येथे १९ मे ला लोकशाही दिन - नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन सज्ज.
विशेष प्रतिनिधी , संतोष कदम.
इंदापूर : - शासनाच्या आदेशानुसार आणि जनतेच्या प्रश्नांना प्रशासनाच्या स्तरावर तातडीने व सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी येत्या १९ मे ( सोमवारी) लामजेवाडी (ता. इंदापूर) येथे तालुकास्तर लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी, अडचणी व विनंत्या ऐकणार असून त्यावर जागेवरच निर्णय घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती इंंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.
भिगवण- बारामती रस्त्यावरील लामजेवाडी गावाील जि. प. शाळेसमोरील हनुमान सभामंडपात सकाळी 11 वाजता हा लोकशाही दिन होणार आहे. सकाळी ते या वेळेत या कार्यक्रमासाठी तालुका स्तरावरील विविध खात्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील. या कार्यक्रमात उत्पन्न, जात, निवासी, अपंगत्व प्रमाणपत्रासाठी अर्ज, शिधापत्रिका (रेशन कार्ड) संबंधी तक्रारी, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य व शिक्षणविषयक अडचणी, जमिनीच्या मोजणी, फेरफार, सात-बारा उतारे व इतर महसूल विभागाशी संबंधित तक्रारी, विविध शासकीय योजनांसाठी अर्ज आणि मार्गदर्शन तसेच वृध्द, विधवा व अपंग पेन्शन अर्ज सादर करण्याची संधी नागरिकांना उपलबध्द होणार आहे.
या लोकशाही दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे व आपले प्रश्न व अडचणी मोकळेपणाने मांडाव्यात. सर्व अर्जदारांनी त्यांच्या तक्रारींशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत आणावी, जेणेकरून कार्यवाही सुलभ होईल, असे आवाहन तहसीलदार बनसोडे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत