Breaking News

०७ मार्च २०२५

जागतिक महिला दिन विशेष..! शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून अजनाळे येथिल अभिनव इंग्लिश मिडियम स्कुलचा नावलौकिक मिळवलेल्या कावेरी गिड्डे - लाडे


 

शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांतील ज्ञान नव्हे, तर समाजाच्या भविष्याचा पाया घालणारा वटवृक्ष. हा वटवृक्ष रुजवण्यासाठी जेव्हा चिकाटी, समर्पण आणि स्वप्नांची जोड मिळते, तेव्हा तो काळाच्या ओघात देखणा आणि मजबूत बनतो. याच प्रेरणादायी प्रवासाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कावेरी लाडे मॅडम...

भंडीशेगाव ता. पंढरपूर या गावात आई सिंधू आणि वडील दत्तात्रय गिड्डे यांच्या पोटी 21 मे 1989 रोजी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात कावेरी मॅडम यांचा जन्म झाला. आजी शिलाबाई आणि आजोबा पंढरीनाथ यलमर यांच्या सहकार्याने कावेरी मॅडम यांचे शिक्षण सुरू झाले. गावातीलच जिल्हा परिषद शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले.

शालेय जीवनातच त्या अभ्यासात हुशार होत्या तसेच शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थिनी होत्या.माध्यमिक शिक्षण घेत असतानाच  शिक्षक होण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. शिक्षक होण्यासाठी डी.एड. करावे लागते, एवढीच माहिती त्यावेळी त्यांना होती. बारावीला उत्कृष्ट गुण मिळवून पहिल्याच फेरीत त्यांनी पंढरपूर येथील अध्यापक विद्यालयात डी.एड. साठी प्रवेश मिळवला आणि 2009 साली उत्तम गुणांनी डी.एड. पदवी पूर्ण केली.

मे 2010 साली अजनाळे येथील हायस्कूलवर कार्यरत शिक्षक शिवाजी दामोदर लाडे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही शिक्षणाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.लग्नानंतर त्यांनी इंग्रजी विषयातून बी.ए. ही पदवी मिळवली. 2013 साली झालेल्या टीईटी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश मिळवले आणि नंतर माध्यमिक शिक्षकासाठीची बी.एड. ही पदवी सुद्धा इंग्रजी विषयातून पूर्ण केली.

आपण शिक्षकच व्हायला पाहिजे, ही वृत्ती त्यांच्या मनात घट्ट रुजली होती. आणि म्हणूनच त्या काळात आपला लहान मुलगा फक्त आठ महिन्यांचा असताना त्यांनी 13 विद्यार्थ्यांना एकत्र करून शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली. त्यांच्या समर्पणाने पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट निकाल लावला. याच यशाने प्रेरित होऊन अभिनव प्ले स्कूलची स्थापना केली. पहिल्याच वर्षी 67 विद्यार्थ्यांनी या स्कूलमध्ये प्रवेश घेतला, ही बाब त्यांच्या प्रयत्नांची पोचपावती होती.

या शैक्षणिक रोपट्याला सिंचन देण्यासाठी पती शिवाजी लाडे यांनी स्वतःची नोकरी सोडून शिक्षण कार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या सहकार्याने 2016 साली "अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे" या स्वयंअर्थसहाय्यित खाजगी शाळेला महाराष्ट्र शासनाची मान्यता मिळाली आणि कावेरी मॅडम यांनी मुख्याध्यापिका म्हणून पदभार स्वीकारून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देण्यास सुरुवात केली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्हा व राज्य गुणवत्ता यादीत उल्लेखनीय यश संपादन केले.पहिल्याच वर्षी आयटीएसई परीक्षेत इयत्ता पहिलीतील विद्यार्थीनीने शंभर पैकी शंभर गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी त्यांना महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनकडून "आदर्श शिक्षिका" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शाळेची विद्यार्थी संख्या वाढत असताना शाळेसाठी नवीन इमारतीची गरज निर्माण झाली. मात्र याच दरम्यान कोरोनामुळे सर्व  ठप्प झाले. या कठीण परिस्थितीतही कावेरी मॅडम यांनी हार मानली नाही. अडचणींच्या वादळातही न डगमगता त्यांनी आपले कार्य अविरत सुरू ठेवले. कठीण परिस्थितीतही चेहऱ्यावर समाधानाची लखलखती झळाळी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे स्वप्न मनात ठेवत त्यांनी कधीही आपल्या कर्तव्यापासून माघार घेतली नाही. पालकांच्या सहकार्याने तात्पुरत्या स्वरूपात झाडाखाली व बंगल्यात शाळा सुरू ठेवली.अखेर  नवीन इमारतीचे स्वप्न साकार झाले. याच धैर्यामुळे शाळेच्या प्रवासाला नवा वेग मिळाला.2022 च्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत एक विद्यार्थी राज्यात नववा आणि तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.मंथन, अक्षरगंगा, स्कॉलरशिप आणि एनएमएमएस सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये दरवर्षी विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत आहेत.2023 पासून महाराष्ट्र स्टेट सब-ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धांमध्ये अभिनवच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय यश संपादन केले आहे.आज परिसरातील दहा ते पंधरा गावांमधील जवळजवळ 500 हून अधिक विद्यार्थी अभिनव पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या विविध क्षेत्रातील यशाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित केला जाणारा 'अभिनव फेस्टिवल' हा दरवर्षीच चर्चेचा विषय ठरत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेता अभिनव निवासी गुरुकुल आणि अभिनव अकॅडमी यांची सुरुवात येत्या शैक्षणिक वर्षापासून अजनाळे येथे करण्यात येत आहे. कावेरी मॅडम यांच्या अथक प्रयत्नांनी अजनाळे गावात अभिनव पब्लिक स्कूलचा देखणा वटवृक्ष उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही तितकेच महत्त्व दिले जात आहे.कावेरी मॅडम यांनी स्वतःच्या कष्टाने आणि चिकाटीने अनेक अडचणींवर मात करत शिक्षणाचा वसा पुढे नेला. त्यांच्या कार्यामुळे संपूर्ण अजनाळे गावाला त्यांचा अभिमान वाटतो.

प्रेरणा ही त्या व्यक्तीला म्हणतात, जी परिस्थितीशी झुंजत असतानाही दुसऱ्यांचे भविष्य घडवते अभिनव पब्लिक स्कूलचा हा यशस्वी प्रवास कावेरी मॅडम यांच्या समर्पणाची, संघर्षाची आणि शिक्षणावरील निष्ठेची एक सुंदर कहाणी आहे.कावेरी मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य म्हणजे केवळ शिक्षण देणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना एक चांगला नागरिक बनवण्याचे कार्य आहे. त्यांचे कार्य हे येणाऱ्या पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.


कावेरी मॅडम यांना आणि त्यांच्या अथक परिश्रमाला सलाम!


संकलन  पत्रकार सचिन धांडोरे  सांगोला 

9834473615

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा