सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
अजनाळे येथे गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान सन २०२४-२५ अंतर्गत शेतकरी राजा सेंद्रिय गट, अजनाळे यांना वनस्पतीजन्य कीटकनाशक बनवण्यासाठी ड्रम चे वाटप खोत साहेब प्रकल्प संचालक (आत्मा) जिल्हा सोलापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात बोलताना खोत साहेब म्हणाले की रासायनिक शेतीचे प्रमाण वाढत चालल्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे यावर तोडगा काढण्यासाठी शासनाने सेंद्रिय शेती संकल्पना राबवण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान हा पथदर्शी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत गाव पातळीवर ५० हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत २५ शेतकऱ्यांचा सेंद्रिय शेती गट स्थापन केला जातो. या गटाला प्रोत्साहन पर निविष्ठा दिल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून वनस्पतीजन्य कीटकनाशक बनवण्यासाठी पाचशे लिटर क्षमतेचे २५ प्लास्टिक टॅंक शेतकरी राजा सेंद्रिय शेती गट यांना देण्यात आले आहेत. या टॅंक चा वापर करून शेतकरी विषमुक्त शेतीमाल पिकवतील अशी त्यांनी आशा व्यक्त केली. या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव, बी.टी.एम. मेघराज पोळ, कृषी सहाय्यक विवेक पाटील व शेतकरी राजा सेंद्रिय गटाचे अध्यक्ष कैलास कुरे, संदीप कुरे व गटातील सर्व सदस्य शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा