Breaking News

कोळा पोलीस स्टेशन आऊट पोस्ट धोकादायक अवस्थेत; इमारत पाडण्याच्या स्थितीत – सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेची शासनाकडे तातडीने नवीन इमारतीची मागणी


 कोळा प्रतिनिधी

गेल्या 30 ते 40 वर्षांपासून कोळा गावातील अस्तित्वात असलेले पोलीस स्टेशन अक्षरशः ढासळण्याच्या अवस्थेत असून आजही धोकादायक इमारतीतूनच पोलिसांचे कामकाज सुरू आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे कोळा बीट कार्यालय इथे असूनही कोणताही बीट अधिकारी या ठिकाणी थांबण्यास तयार नसल्याचे चित्र कायम आहे. कारण एकच—इमारत पूर्णपणे जीर्ण, असुरक्षित आणि अव्यवहार्य.

स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, आपत्कालीन सेवा बळकट करण्याची गरज आणि कायदा-सुव्यवस्थेची कार्यक्षमता या सर्व बाबींकडे शासनाने गंभीरतेने पाहण्याची मागणी सार्वभौमिक मानवाधिकार संघटनेने वारंवार केली आहे. गेल्या चार वर्षांपासून संघटना सातत्याने पाठपुरावा करत आहे; तथापि अद्याप शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

सोलापूर जिल्हा अध्यक्ष माननीय सावंता सरगर, जिल्हा सचिव अमित मोरे, तालुकाध्यक्ष अभिमान मोरे व तालुका सचिव दिनेश काटे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे की, कोळा गावातील पोलीस स्टेशनची विद्यमान अवस्था ही केवळ प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक नसून गावाच्या सुरक्षेशी खेळ करणारी परिस्थिती आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार,

इमारतीच्या भिंती तडकल्या आहेत,

छप्पर गळकी झाले असून पावसाळ्यात धोका अधिक वाढतो,

विद्युत व पायाभूत सुविधा पूर्णतः अपुरी आहेत,

आतील खोल्या वापरण्यास अयोग्य आहेत.

या परिस्थितीत पोलिस कर्मचाऱ्यांना सुरक्षित कार्यपरिसर मिळणे तर दूरच, पण नागरिकांनाही मूलभूत सेवा मिळणे कठीण होत आहे. म्हणूनच संघटनेने शासनाला “तत्काळ नवीन पोलीस स्टेशन इमारतीची उभारणी सुरू करावी” अशी ठाम आणि परखड मागणी केली आहे.

कोळा गावाच्या सुरक्षेसाठी, कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि पोलिसांसाठी सुरक्षित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत अशी गावकऱ्यांचीही अपेक्षा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत