ग्रामपंचायत ढवळस येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा उत्साहात संपन्न
विशेष प्रतिनिधी मंगळवेढा
नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस या सामाजिक संघटनेच्या वैभव गीते यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संविधान अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्याच अनुषंगाने दि. 26 डिसेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय, ढवळस (ता. मंगळवेढा) येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शनात्मक कार्यशाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती, उपविभागीय स्तर मंगळवेढा यांची सभा दि. 07/10/2025 रोजी मा. उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्या दालनात पार पडली होती. या सभेमध्ये गावपातळीवर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत काम करणारे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व पोलीस पाटील यांना कायद्याबाबत प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यासाठी श्री. चिमाजी महादेव कसबे (सदस्य), श्री. येताळा जालिंदर खरबडे (निमंत्रित सदस्य) व ॲड. रोहित तानाजी एकमल्ली (निमंत्रित सदस्य) यांना ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत ढवळस येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. येताळा जालिंदर खरबडे यांनी उपस्थितांना कायद्याची सविस्तर माहिती देत सामाजिक सलोखा, संविधानिक मूल्ये व कायद्याची योग्य अंमलबजावणी यावर भर दिला.
कार्यक्रमास लोकनियुक्त सरपंच सौ. रोहिणीताई सुधाकर हेंबाडे, उपसरपंच सौ. सुरेखा सुभाष कवडे, ग्रामपंचायत सदस्य सौ. अश्विनी अनिल मोरे, श्री. सतीश अर्जुन मोरे, श्री. सौदागर सर्जेराव गायकवाड, श्री. निवृत्ती गणपत सोनलकर, सौ. पूजा संतोष गायकवाड, सौ. भारती आनंदा हेंबाडे, माजी सरपंच आबासो मोरे, बचत गट प्रतिनिधी सौ. जयश्री मोरे तसेच देवाप्पा हेंबाडे, महादेव गायकवाड, प्रकाश गायकवाड, आबासो गायकवाड, किसन भाऊ आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे गावपातळीवर संविधानाची जाणीव व ॲट्रॉसिटी कायद्याबाबत जागरूकता वाढल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत