पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस साजरा.
सांगोला गौरव न्युज नेटवर्क
खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर पब्लिक स्कूलमध्ये ख्रिसमस सण अत्यंत आनंदी, उत्साही व उत्सवमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर यांच्या हस्ते ख्रिसमस ट्री सजवून व दिवे प्रज्वलित करून करण्यात आली.
यावेळी शाळेचा संपूर्ण परिसर आकर्षक व रंगीबेरंगी सजावटीने तसेच ख्रिसमस ट्रीवरील रोषणाईमुळे उजळून निघाला होता. काही विद्यार्थी सांता क्लॉजच्या वेशात सहभागी झाल्याने लहान मुलांमध्ये विशेष आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी मधुर ख्रिसमस कॅरोल गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली, तर प्री-प्रायमरी विभागाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना ख्रिसमस सणाचा अर्थ व त्यामागील संदेश—प्रेम, त्याग, सेवा व मानवता—याविषयी मार्गदर्शन केले तसेच येणाऱ्या नववर्षासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना ख्रिसमस व नववर्षाच्या शुभेच्छा देत सणाचे सामाजिक व नैतिक महत्त्व विशद केले.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते केक कापण्यात आला व सर्व विद्यार्थ्यांना केक व चॉकलेट्स वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन इयत्ता सहावी मधील कृष्णा प्रशांत लाडे, कृष्णा योगेश लाडे, यश सुभाष टाकळे, निधीश संभाजी बाबर, साक्षी सचिन सावंत व गौरी अमोल नसले या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले.
सदर कार्यक्रम शाळेच्या अकॅडमिक इनचार्ज मृणाल राऊत मॅडम, सांस्कृतिक विभागप्रमुख सौ. रुपाली गायकवाड मॅडम तसेच इतर शिक्षकांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यशस्वीपणे पार पडला.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आनंद, एकोप्याची भावना तसेच सणांचे महत्त्व रुजवणारा ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत