Breaking News

अजनाळे गावच्या सरपंच सौ. अनिता पवार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार


 

अजनाळे प्रतिनिधी :

महाराष्ट्र फौंडेशन सामाजिक व शैक्षणिक संस्था, माळीनगर यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजनाळे गावच्या विद्यमान सरपंच सौ. अनिता चंद्रकांत पवार यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवार, दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सोलापूर येथील लोकमान्य टिळक सभागृहात भव्य सोहळ्यात हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

सौ. अनिता पवार यांना पुरस्कार माजी पोलीस उपायुक्त मा. दिपक आर्वे साहेब आणि महाराष्ट्र फौंडेशनचे अध्यक्ष मा. रणजित लोहार सर यांच्या हस्ते शाल, ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, तसेच अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. अनिता पवार यांनी आपल्या कार्यकाळात अजनाळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा आणि महिला सबलीकरणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीने विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवून गावाचा सर्वांगीण विकास साधला आहे. त्यामुळेच त्यांची निवड आदर्श सरपंच पुरस्कारासाठी झाली असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. अनिता पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले, "हा पुरस्कार माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हा सन्मान संपूर्ण अजनाळे ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच शक्य झाला आहे. गावाच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध राहीन." त्यांनी महाराष्ट्र फौंडेशनचे आभार मानले व आपल्या कुटुंबियांसह गावकरी, सहकारी व मित्रपरिवाराचे विशेष उल्लेख करून कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास सौ. पवार यांचे पती श्री. चंद्रकांत पवार व मित्र परिवार देखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुरळीत व प्रेरणादायी वातावरणात पार पडले.

सौ. अनिता पवार यांच्या या यशामुळे अजनाळे गावात आनंदाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या कार्याने इतर सरपंचांसाठीही एक आदर्श निर्माण केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत