Breaking News

अभिनव पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी

 


 सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:

अखंड हिंदुस्तानाचे दैवत,हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे अजनाळे गावच्या माजी सरपंच सुजाताताई देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी विलास लाडे, प्रकाश धांडोरे, संस्थाध्यक्ष शिवाजी लाडे तसेच मुख्याध्यापिका कावेरी गिड्डे आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनींच्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य,पराक्रम यांची गाथा गाणाऱ्या ,त्यांच्या जीवनाचा परिचय देणाऱ्या आपल्या जोशपूर्ण मनोगतातून विद्यार्थ्यांनी शिवछत्रपतींचा जयजयकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी सत्तेपासून सर्वसामान्यांचा बचाव केला व हे हिंदवी स्वराज्य स्थापन केले आणि म्हणूनच आज आपण आपल्या राष्ट्रात सुरक्षितपणे मोकळा श्वास घेत आहोत अशा भावनांसह छत्रपती नसते तर.. अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँसाहेब यांच्या वेशभूषांनी सर्वांचे  लक्ष वेधून घेतले. यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील गीतावर अप्रतिम असे लेझीम नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. त्याचबरोबर इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थिनींनीही शिवरायांवर आधारित  नृत्य सादर केले.या गीतांसाठी भारती सर यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी इयत्ता आठवी मधील एन एम एम एस या परीक्षेतील पात्र विद्यार्थी, सोलापूर जिल्हा सब जुनिअर ॲथलेटिक  स्पर्धा 2025 मधील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू तसेच अजंठा आर्ट अकॅडमी अंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनव स्कूल हे नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त करत अभिनव स्कूल व्यवस्थापन व टीमचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कदम यांनी केले तर  कार्यक्रमाच्या उत्साह पूर्ण यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत