प्रतिनिधी - संतोष कदम.
वालचंदनगर :- ( ता. इंदापूर) विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी विविध स्पर्धा परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावत असतात. विद्यार्थ्यांना बालवयातच स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी व बुद्धीचा विकास व्हावा या हेतूने श्री वर्धमान विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा, एन एम एम एस परीक्षा, इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा, भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा, एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला परीक्षा, एमटीएस परीक्षा, बीडीएस परीक्षा अशा विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. यापैकीच मंथन सामान्यज्ञान परीक्षा राज्यस्तरीय पातळीवर विद्यार्थ्यांचे परीक्षा घेऊन मूल्यांकन करत असते. या परीक्षेत गणित, बुद्धिमत्ता मापन, मराठी व इंग्रजी यासारखे महत्त्वाचे विषय असतात.
मंथन परीक्षेत विद्यालयाचे इयत्ता पाचवी ते सातवीच्या वर्गातील 63 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. या परीक्षेत विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला असून 5 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये चमकले आहेत. इयत्ता पाचवीतील प्रांजली निलेश कुचेकर हिने 300 पैकी 218 गुण प्राप्त करून केंद्रात दुसरी तर राज्यात 41 वे स्थान पटकाविले आहे. इयत्ता सहावीतील तन्वी मल्लिकार्जुन वच्चे 260 गुण प्राप्त करून केंद्रात पहिली तर राज्यात 17 वे स्थान व श्रावणी महेश कुमार निंबाळकर हिने 224 गुण प्राप्त करून केंद्रात दुसरी तर राज्यात 35 वे स्थान पटकावले आहे. इयत्ता सातवीतील प्राजक्ता गणेश कुंभार हिने 206 गुण प्राप्त करून केंद्रात पहिली तर राज्यात 31 वे स्थान व प्रज्वल हरी थोरात याने 168 गुण प्राप्त करून केंद्रात दुसरा तर राज्यात 50 वे स्थान पटकावले आहे.
विद्यालयात स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी या दृष्टीने गुरुकुल वर्ग ही संकल्पना राबवून या वर्गात स्पर्धा परीक्षेची अतिरिक्त मार्गदर्शन केल्यामुळे महाराष्ट्र राज्य स्कॉलरशिप परीक्षा व मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे. सुरज मोरे, अनिल गवारी, लक्ष्मी सरगर,स्मिता मुसळे, मीनाज शेख, शुभांगी शेंडगे व देवराम प्रधान या शिक्षकांनी अतिरिक्त वेळेत मार्गदर्शन व प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करून घेतला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उत्तुंग यशासाठी व विद्यालयाची यशाची परंपरा अशीच अखंडित चालत राहो यासाठी शाळा समिती अध्यक्ष मकरंद वाघ, उपाध्यक्ष प्रशांत महामुनी, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक बाळासाहेब पडारी, उपप्राचार्य अरुण निकम, पर्यवेक्षक काशिनाथ हिरवे, पर्यवेक्षक चंद्रकांत कांबळे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा