Breaking News

०४ सप्टेंबर २०२२

हजारोंच्या उपस्थितीत साश्रूपुर्ण नयनांनी ह. भ. प शारदा देवी साळुंखे पाटील (काकी) यांच्या पार्थिवर जवळा येथे अंत्यसंस्कार

सांगोला : तालुका प्रतिनिधी स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या लहान मुलांचे आणि काकासाहेब साळुंखे पाटील यांनी उभा केलेल्या राजकीय परिवर्तनाच्या चळवळीचे पुढे काय होणार..? असा सवाल उपस्थित होत असताना ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील तथा काकींनी जराही विचलित न होता आपल्या मुलांना विविध क्षेत्रात दर्जेदार शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभा केले. केवळ कौटुंबिकच नव्हे तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातही काकींनी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच ह.भ.प. काकी गेल्या १०० -२०० वर्षातील सर्वात कर्तुत्वान महिला म्हणून ओळखल्या जातील असे प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले. जवळा ता. सांगोला येथे ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आमदार शहाजीबापू बोलत होते. यावेळी स्वर्गीय माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पत्नी रतनकाकी देशमुख, भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे, आमदार संदीप बजेरीया, राम साळे, विलासराव जगताप, उमेश परिचारक, जि.प.सदस्य विक्रम शिंदे, बाळराजे पाटील, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, अजिंक्यराणा पाटील, भगीरथ भालके, सागर पाटील, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, सरचिटणीस संतोष पवार, ज्येष्ठ नेते प्रबुद्धचंद्र झपके, नारायण जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, प्रफुल्ल कदम, मारुती जाधव, जि प सदस्य सचिन देशमुख, लतीफ तांबोळी, राजेंद्र हजारे, उपविभागीय प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, पोलीस उपविभागीय अधिकारी राजश्री पाटील, तहसीलदार अभिजीत पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, अनंत कुलकर्णी आदिसह राजकीय सामाजिक प्रशासकीय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. सांगोला तालुक्यातील दिन-दलित, भटके-विमुक्त, वंचित, उपेक्षित, शोषित, सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांच्या माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह भ प शारदादेवी साळुंखे पाटील यांची जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून अंत्ययात्रा सुरू झाली. यावेळी जवळा येथील त्यांच्या आलेगाव रोडवरील शेतात काकींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राज्यभरातील हजारो नातेवाईक व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. हजारो नागरिकांच्या साश्रू नयनांनी लाडक्या काकींना अखेरचा निरोप देण्यात आला.मा. आम. दिपकआबा व डॉ.प्रदीप दादा साळुंखे या दोन्ही बंधूंनी त्यांच्या चितेला अग्नी दिला. अंत्यसंस्कार समयी अचानक वरुणराजानेही हजेरी लावल्याने काकींच्या निधनाचे दुःख झाल्याने जणू आभाळही रडत असल्याचा भावनिक प्रसंग निर्माण झाला होता. अत्यंत भावपूर्ण वातावरणात ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील तथा सांगोला तालुक्याच्या लाडक्या काकी अनंतात विलीन झाल्या. यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, काकींनी आयुष्यभर कष्ट आणि संघर्ष करून आपल्या मुलांसाठी आज हे वैभव उभा केले आहे. स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील यांच्या निधनानंतर ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांनी अनेक वर्षे सांगोला तालुक्याचे कणखरपणे नेतृत्व केले आणि आपल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य खरोखरच उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असेच आहे. केवळ दिपकआबावर नव्हे तर संपूर्ण सांगोला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांवर काकींनी स्वतःच्या मुलाप्रमाणेच प्रेम केले. आज काकींच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आध्यात्मिक क्षेत्रात कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याचेही शेवटी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नमूद केले. यावेळी माजी आमदार विलासराव जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, जि प सदस्य सचिन देशमुख, विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार, प्रफुल्ल कदम,मारुती जाधव, विवेक आयवळे, प्रभाकर कसबे, प्रकाश पाटील बोरगावकर आदींनी ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या मनोगतातून काकींना श्रद्धांजली अर्पण केली. चौकट ; १) काकींनी सांगोला तालुक्याला दोन नव्हे तर माझ्यासह तीन आमदार दिले. पती स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील आणि मुलगा मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या रूपाने ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला दोन आमदार दिले असे बोलले जाते. मात्र मलाही आमदार करण्यात काकींचाच सिंहाचा वाटा आहे. म्हणून मी आमदार झाल्यावर सर्वप्रथम काकींचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यामुळे स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील, मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील व मी असे दोन नव्हे तर माझ्यासह तीन आमदार ह.भ. प. शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला दिले. ; आमदार शहाजीबापू पाटील २) संपूर्ण जवळा गावावर शोककळा ; महिलांच्या अश्रूंचा बांध फुटला..!. जवळा गावाला तळहातातील फोडाप्रमाणे आणि परिसरातील सर्वसामान्य गोरगरीब महिलांना आपल्या कुटुंबातील सदस्यप्रमाणे जपलेल्या ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या अंत्ययात्रेदरम्यान गावातील सर्वसामान्य व गोरगरीब महिलांनी आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडून काकींच्या अनंत आठवणी जागवल्या. सदैव इतरांना मदत करण्यास तत्पर असलेल्या काकींच्या निधनामुळे संपूर्ण जवळा गावावर अक्षरशः शोककळा पसरली होती. गाव कडकडीत बंद ठेवून गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या काकींना श्रद्धांजली वाहिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा