कोळा येथे वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न – नागरिक त्रस्त, शासनाने तात्काळ उपाययोजना करावीची मागणी
कोळा /अमित मोरे
कोळा (प्रतिनिधी) – सांगोला तालुक्यातील कोळा गावात गेल्या काही महिन्यांपासून वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा सामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बाबासाहेब आंबेडकर चौक ते जूनोनी रोड तसेच बाबासाहेब आंबेडकर चौक ते गौडवाडी रोड या मार्गांवरील वाढत्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत.
सुमारे चार महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत व प्रशासनाने या दोन्ही रस्त्यांवरचे अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी खुले केले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. उलट रस्त्यांवर वाहनांची गर्दी अधिक वाढली असून, मोठ्या वाहनांसह साधी एस.टी. बस सुद्धा या रस्त्यावरून नीटपणे जाऊ शकत नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील नागरिकांनी शासनाचे लक्ष या समस्येकडे वेधले आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र शासकीय पार्किंगची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी, अथवा रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिक वारंवार करत आहेत.
यासंदर्भात मानव अधिकार संघटना, सोलापूर जिल्हा अध्यक्ष जेष्ठ नागरिक श्री. सावंता सरगर आणि जिल्हा सचिव अमित मोरे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “कोळा गावातील वाहतूक कोंडीमुळे अपघाताचा धोका वाढला असून, रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवा देखील वेळेवर पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. शासनाने लवकरात लवकर कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा.”
स्थानिक पातळीवर या समस्येबाबत जनतेत तीव्र नाराजी असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत