Breaking News

ऊस वाहतुकीसाठी रिफ्लेक्टर बसविणे व वाहतूक नियम मार्गदर्शन कार्यक्रम युटोपियन शुगर्स लिमिटेड येथे संपन्न


 विशेष प्रतिनिधी: येताळा खरबडे

मंगळवेढा (प्रतिनिधी) – ऊस गळीत हंगाम २०२५-२६ दरम्यान अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मंगळवेढा पोस्टे हद्दीतील युटोपियन शुगर्स लिमिटेड, कचरेवडी (ता. मंगळवेढा) येथे विशेष सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉली तसेच वाहनांना रिफ्लेक्टर टेप बसविण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी वाहतूक विभागातील PSI विजय पिसे, तसेच पोहेकॉ १४२१ यादव आणि पोकॉ १०६८ साळुंखे यांनी उपस्थित वाहनचालकांना रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. त्यांनी रात्रीच्या वेळी वाहनांवर रिफ्लेक्टर असणे किती आवश्यक आहे हे सांगत, वेगमर्यादा, हेल्मेटचा वापर, आणि मद्यप्राशन करून वाहन चालवू नये या बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास युटोपियन शुगर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, संचालक मंडळ सदस्य, कारखाना प्रशासनाचे अधिकारी, तसेच परिसरातील नागरिक, पोलीस पाटील, ऊस वाहतूकदार आणि चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे ऊस वाहतुकीदरम्यान होणाऱ्या अपघातांना आळा बसण्यास मदत होणार असून, कारखाना प्रशासन व पोलीस विभागाने संयुक्तरीत्या राबविलेला हा उपक्रम सर्वांसाठी आदर्श ठरत आहे.
या कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले असून, अशा जनजागृती कार्यक्रमांची सातत्याने गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत