ऊस वाहतुकीस सुरक्षिततेची जोड – मंगळवेढा पोलिसांकडून रिफ्लेक्टर बसविणे व वाहतूक मार्गदर्शन कार्यक्रम
विशेष प्रतिनिधी: येताळा खरबडे
मंगळवेढा (प्रतिनिधी) – ऊस गळीत हंगाम २०२५-२६ दरम्यान रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि ऊस वाहतूक सुरळीत पार पडावी, यासाठी मंगळवेढा पोलीस ठाण्याच्या वतीने श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना येथे विशेष रिफ्लेक्टर बसविणे आणि वाहतूक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवर रात्री दृश्यमानता वाढविण्यासाठी रिफ्लेक्टर बसविण्यात आले. तसेच ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीचे नियम, वेगमर्यादा, तसेच अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता उपायांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवेढा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात वाहतूक विभागातील पोसई पिसे, पोहेकॉ १४२१ यादव, पोकॉ १०६८ साळुंखे आणि चापोकॉ D५४ जुंदळे यांनी सक्रीय सहभाग घेतला.
साखर कारखान्याच्या परिसरात राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ऊस वाहतुकीदरम्यान अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असून, कारखान्यातील चालक व वाहतूक कर्मचारी यांच्यात वाहतुकीबाबत जागरूकता वाढण्यास हातभार लागणार आहे.
पोलिस प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ऊस गळीत हंगाम सुरळीत व सुरक्षित पार पडेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत