सांगोला तालुक्यातील अतीवृष्टीग्रस्तांसाठी ८९ कोटी २१ लाख निधी मंजूर: तहसीलदार संतोष कणसे..! ७२८४५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८९.२१ कोटी होणार जमा
सांगोला: तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वच्या सर्व १० मंडलांतील नुकसानीचे पंचनामे अखेर पूर्ण झाले आहेत. तालुक्यातील ७२ हजार ८४५ शेतकऱ्यांच्या सुमारे ५१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावरील मका, बाजरी, डाळिंब, पेरू, केळी आदी शेती व फळपिके, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकूण ८९ कोटी २१ लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर भरण्याचे काम सुरू असून, दोन दिवसांत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण निधी ८९ कोटी २१ लाख रुपये जमा होईल, अशी माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी दिली.
सांगोला तालुक्यात चालू वर्षी मे महिन्यातच मान्सूनपूर्व अवकाळी, मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, तूर आदी पिकांची पेरणीही वेळीच पूर्ण झाल्याने शेतकरी सुखावला होता. दरम्यान, खरीप हंगामातील पिके काढणीपूर्वीच सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली.
त्यानंतर ११ ते ३० सप्टेंबर यादरम्यान सांगोला तालुक्यातील सर्वच मंडलांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती व फळपिकांसह अतिवृष्टीमुळे कडलास, राजुरी, डिकसळ, सरगरवाडी, आदी गावांतील लोकवस्तीत पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्वच मंडलांमधील नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली होती.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे , आमदार डॉ. बाबासाहेव देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, शासकीय अधिकारी यांच्या समवेत नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार संतोष कणसे यांनी येथे नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी दीपाली जाधव यांच्यासह गाव कामगार तलाठी, सहायक कृषी अधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्या संयुक्तपणे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करून ११ सप्टेंबर ते१५ आक्टोबर यादरम्यान सुमारे ५१ हजार ३३५ हेक्टर क्षेत्रावरील शेती व फळपिकांचे पंचनामे पूर्ण केले आहेत. एकूण नुकसान भरपाई निधी ८९ कोटी २१ लाख रुपये जमा होईल
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगोला तालुक्यातील चोपडी येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करीत पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच नाझरे, वझरे येथे तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव यांनी भेट देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा देत नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार पंचनामे करण्यात आले. लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान खात्यावर जमा होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्या नाहीत