सांगोला गौरव न्यूज
पायोनियर पब्लिक स्कूल मध्ये आज शिक्षक दिन मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस संपूर्ण देशभरात शिक्षक दिन म्हणून पाळला जातो.
या पार्श्वभूमीवर शाळेत सकाळच्या प्रार्थना सभेपासूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली. प्रार्थना, विचार, बातम्या, व्याख्याने अशा सर्व गोष्टी मुलांनीच पार पाडल्या. यानंतर विद्यार्थ्यांनी वर्गात जाऊन शिकवण्याचा अनुभव घेतला. शिक्षक असणे किती जबाबदारीचे व आव्हानात्मक कार्य आहे, हे प्रत्यक्ष अनुभवताना विद्यार्थ्यांनी ते आपल्या मनोगतातून मांडले.
याप्रसंगी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांसाठी रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर, शाळेचे प्रिन्सिपल सतीश देवमारे सर, अकॅडमिक इंचार्ज मृणाल राऊत मॅडम तसेच इतर सर्व शिक्षकाच्या हस्ते झाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. विद्यार्थ्यांनी मनोगतातून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इयत्ता पाचवी व सहावीच्या मुलींनी सुंदर गाणी व नृत्य सादर करून ती आपल्या प्रिय शिक्षकांना अर्पण केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या दैनंदिन सवयींवर आधारित हलक्याफुलक्या मिमिक्री सादर करून उपस्थितांना खळखळून हसवले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की, "विद्यार्थ्यांनी केलेले नियोजन व सादरीकरण अत्यंत स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करून उत्तम गुण मिळवावेत आणि आपल्या शाळेचे तसेच पालकांचे नाव उज्ज्वल करावे हीच खरी शिक्षक दिनाची भेट ठरेल."
प्रिन्सिपल सतीश देवमारे सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या यशातच शिक्षकांचे यश दडलेले असते. मुलांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि मेहनत या गुणांच्या आधारे जीवनात प्रगती करावी.”
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजन व सूत्रसंचालन हे इयत्ता सहावी मधील विद्यार्थ्यांनीच केले होते आणि त्यांना अकॅडमिक इंचार्ज मृणाल राऊत मॅडम व सांस्कृतिक विभाग प्रमुख रुपाली गायकवाड मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शिक्षकांविषयीची कृतज्ञता आणि आनंदी वातावरणामुळे हा दिवस संस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत