Breaking News

अजनाळे गावात डाळिंबानंतर शिमला मिरचीचे नवे यश; संतोष कोळवले मिरची उत्पादनातून मालामाल

 



अजनाळे: सचिन धांडोरे:

सांगोला तालुक्यातील अजनाळे गावाने डाळिंबाचा ‘कॅलिफोर्निया म्हणून जगभर ओळख निर्माण केल्यानंतर आता शिमला मिरचीच्या उत्पादनातून नवे यश गाठले आहे. यंदा अजनाळे परिसरात सुमारे दोनशे एकर क्षेत्रावर शिमला मिरचीची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे येथील शेतकरी डाळिंबासोबत आता शिमला मिरचीला जोडपीक म्हणून घेऊ लागले असून, कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे वाढू लागला आहे.

अजनाळे येथील शेतकरी संतोष हिरादास कोळवले यांनी १० मे रोजी दोन एकर क्षेत्रावर शिमला मिरचीची लागवड केली आहे. त्यांनी ४.५ फूट दोन बेडमधील अंतर आणि दोन रोपांमधील एक फूट अंतर ठेवत सुमारे ३२ हजार रोपांची लागवड केली. यामुळे योग्य अंतरावर आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने लागवड केल्याने उत्पादनात चांगली वाढ दिसून आली आहे.

संतोष कोळवले यांना १ जूलै रोजी पहिला तोडा करता आला असून, त्यातून ४ टन माल मिळाला. त्याचा दर किलोला ६४ रुपये मिळाल्याने त्यांना पहिल्या तोड्यातून तब्बल २ लाख ६६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर ७ जुलै रोजी दुसऱ्या तोड्यात ६ टन माल निघाला, ज्याला ७३ रुपये प्रतिकिलो दर मिळाल्याने ५ लाख ८४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले. तिसऱ्या तोड्यात, १५ जुलै रोजी ९.५ टन शिमला मिरचीची आवक झाली असून, ७४ रुपये प्रतिकिलो दराने विक्री करून त्यांनी ७ लाख ३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

सध्या या लागवडीतील ३२ हजार रोपांमधून एकूण ५० टन शिमला मिरचीचे उत्पादन अपेक्षित आहे. सरासरी ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री झाली तरी एकूण ३५ लाख ४३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज कोळवले यांनी व्यक्त केला आहे. या उत्पादनातून साधारण १५ लाख रुपये खर्च वजा केला तर त्यांना जवळपास १९ लाख ४३ हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे.

डाळिंबाच्या उत्पादनातून शेतकऱ्यांना पैसा येण्यासाठी साधारण २०० दिवस लागतात, परंतु शिमला मिरचीपासून केवळ ५० दिवसात उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कमी कालावधीत पैसे मिळवण्यासाठी शेतकरी या पिकाकडे वळत असल्याचे चित्र अजनाळे परिसरात दिसत आहे.

डाळिंबासोबतच शिमला मिरची हे पैसे देणारे पीक तयार झाल्याने येथील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. संतोष कोळवले यांच्या यशस्वी प्रयोगामुळे अनेक शेतकरी या पिकाकडे वळण्याची शक्यता आहे. अजनाळे गावाने पुन्हा एकदा शेतीच्या क्षेत्रात नवा आदर्श घातला आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत