चिंचोली रोडच्या बेकायदेशीर डाळिंबाच्या मार्केटला आळा बसणार कधी?
सांगोला/करण मोरे
सांगोला तालुक्यात डाळिंब उत्पादन ही मुख्य पिकांपैकी एक असल्याने, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर डाळींबाची खरेदी-विक्री होते. मात्र, अधिकृत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव पद्धतीने विक्री न करता चिंचोली रोडवर बिनधास्त आणि बेकायदेशीरपणे डाळींब विक्री सुरू आहे. यामुळे बाजार समितीला महसुली फटका बसत असतानाच, शासनाचाही महसूल बुडत आहे.
याबाबत अनेक वेळा शेतकरी संघटनांनी तक्रारी करूनही बाजार समिती आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हे तर काही व्यापाऱ्यांकडून एजंटांच्या माध्यमातून शेतकऱ्यांवर दबाव टाकून कमी दरात डाळींब खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सांगोल्यात कारवाईची मागणी
या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यातील शेतकरी संघटना आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी केली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीनेही या बेकायदेशीर व्यवहारांवर कारवाई करत अधिकृत मार्केटमध्येच व्यवहार व्हावेत यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
प्रशासनाचा मौन संशयास्पद
दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचे व्यवहार खुलेआम चालू असताना, प्रशासन आणि बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष का केले? हा प्रश्न सध्या नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
शेतकऱ्यांची मागणी : तातडीने ठोस पावले उचलावीत
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून उत्पादित केलेले डाळींब अधिकृत लिलाव पद्धतीने विकले गेले पाहिजे, त्यासाठी बाजार समिती प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि अवैध मार्केटवर कठोर कारवाई करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत