पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
पायोनियर निवासी गुरुकुल,य.मंगेवाडी येथे दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुशिष्य परंपरेला उजाळा देत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थाध्यक्ष अनिल येलपले सर अध्यक्ष म्हणून लाभले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात लेखक, कवी व व्याख्याते श्री सुनील जवंजाळ सर उपस्थित होते. त्याचबरोबर पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ. अमोल रणदिवे सर,संस्थेच्या सचिव मनीषा येलपले मॅडम, गर्ल्स हॉस्टेलच्या विभागप्रमुख ज्योती रणदिवे मॅडम, पूजा होटे मॅडम, बॉईज हॉस्टेलचे विभाग प्रमुख राज माळी सर, सोमनाथ आदलिंगे सर, दिलीप जावीर सर, अजित रणदिवे सर व समाधान सातपुते सर यांनी कार्यक्रमास विशेष उपस्थिती दर्शविली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व व्यासमुनींच्या प्रतिमा पूजनाने झाली.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या श्री सुनील जवंजाळ यांनी विद्यार्थ्यांना गुरू आणि आईवडिलांचे आयुष्यातील अनमोल महत्व पटवून दिले. त्याचबरोबर निसर्गातील प्रत्येक वस्तू आपली गुरु असते, हा एक आगळावेगळा विचार आपल्या प्रभावी शैलीतून सांगितला.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्था प्रमुख श्री. अनिल येलपले सर यांनी गुरूशिवाय आयुष्यच अपूर्ण आहे हा विचार मांडला.श्री. रणदिवे सर यांनी मुलांना संबोधित करताना सांगितले की शाळेत शिवकवणारेच फक्त गुरू नसतात तर आयुष्यभर जिथे जिथे तुम्हाला अडचण येते तिथे तिथे मार्ग दाखवणारा हा तुमचा गुरूच असतो.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनोगतातून गुरूविषयी असणारी आत्मीयता व्यक्त केली. इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुली तसेच आठवी ते दहावीच्या मुली यांनी "गुरु" ही मध्यवर्ती कल्पना धरून नृत्याविष्कार सादर केले व उपस्थितांची वाहवा मिळवली. शेवटी झालेला गुरूंच्या चरणप्रक्षालनाचा व गुरूंचा आशीर्वाद घेण्याचा भावनिक कार्यक्रम पार पडला व कार्यक्रमाची सांगता झाली.
आभार प्रदर्शन श्रावणी कंड्रे हिने केले तर सूत्रसंचालन प्रणिती पवार हिने केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत