Breaking News

शक्तीपीठ महामार्गाच्या सांगोला तालुक्यातील भूसंपादनासंदर्भात प्रशासनाने प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधावा..! शासनाने कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय रद्द करावा अन्यथा शेतकरी बांधवांचा प्रचंड विरोध राहील : संतप्त शेतकरी बांधव..!


 

सांगोला/ प्रतिनिधी: 

शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सरकारने व प्रशासनाने सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घ्याव्यात शासनाने शक्तिपीठ महामार्ग जमीन संपादनासंदर्भात धोरण  जाहीर करावे. अन्यथा या शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा विरोध राहील अशी भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. शासन प्रतिनिधींनी तसेच प्रशासनाने प्रत्यक्षात बाधित शेतकऱ्यांशी प्रत्येक गावात जाऊन संवाद साधावा . काही बाधित  शेतकऱ्यांची पूर्ण जमीन शक्तीपीठ महामार्गामध्ये जात असल्याने भविष्यात या शेतकऱ्यांना जमीन कोठून मिळणार व कोण विकत देणार? हा प्रश्न असल्याने शेतकऱ्यातून तीव्र प्रतिक्रिया समोर आल्या. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांपुढे आपल्या समस्या व्यथा व्यक्त केल्या. या शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी आयोजित बैठकीमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे.

या बैठकीसाठी प्रांताधिकारी बी .आर. माळी, तहसीलदार संतोष कणसे, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी दिपाली जाधव,ए. यु . तोडकरी,आर. ई. महाले ,डी .यु .नगरकर, एस .पी. कोळी, आर.डी. माने, अनुप जावळे, अतुल लेंडवे, प्रसन्न राऊत हे अधिकारी उपस्थित होते. सांगोला पंचायत समिती बचत भवन येथे गुरुवार दिनांक 26 जून रोजी शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगोला तालुक्यातील भूसंपादन या विषयावर तलाठी ,ग्रामसेवक यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना मार्गदर्शक माहिती व सूचना दिल्या 


यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा समस्या प्रशासनाकडे मांडल्या. वाढत्या कुटुंब व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांकडे थोडीफार जमीन आहे तीही जमीन तालुक्यातील काही शेतकऱ्यांची शक्तीपीठ महामार्गमध्ये बाधित झालेली आहे .त्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे असून एकदा जमीन गेली का परत मिळणार नाहीत. त्यामुळे ते शेतकरी नाराज असून या शक्तिपीठ महामार्गास विरोध करीत आहेत. 

यावेळी मा. पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या जमिनी बाबत सरकार भूमिका मांडत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीची विभागणी व त्यांचे क्षेत्र लक्षात घेऊन सरकारने  शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा . शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून एकसंघपणे शक्तीपीठ महामार्गास विरोध करण्यासाठी पुढे यावे.

चौकट: 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असताना पुन्हा शक्तिपीठ महामार्ग कशासाठी ? नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात जमीन गेली आहे. असे असताना पुन्हा शक्तीपीठ महामार्गासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची 750 हेक्टर जमीन या रस्त्यामध्ये जाणार असल्याने शेतकऱ्यांचा या शक्तिपीठ महामार्गास विरोध आहे.शेतकऱ्यांच्या अडचणी व समस्या लक्षात घ्याव्यात. या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात बाधित गावातील ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत. बाधित शेतकरी व राजकीय नेते एकत्र येऊन या शक्तीपीठ महामार्गास विरोध करतील. महामार्गाचा सर्वसामान्यांना उपयोग काय ?आटपाडी तालुक्यातील शेटफळे व सांगोला तालुक्यातील चिंचोली येथे या रस्त्यास प्रवेशद्वार आहे .याचा फायद्यापेक्षा तोटा अधिक असल्याने शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. शक्तिपीठ महामार्ग करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी विरोधी भूमिका घेणाऱ्या काही व्यक्तींचा पुढारपणा शेतकरी बांधव चालू देणार नाहीत

 मा. जि. प. सदस्य ॲड. सचिन देशमुख 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चौकट:२) शक्तीपीठ महामार्गाच्या सांगोला तालुक्यातील भूसंपादनासंदर्भात सरकारने व अधिकार्‍यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे. जमिनीचे योग्य मूल्यांकन जाहीर करावे. जमिनीची प्रतवारी न करता योग्य तो मोबदला जाहीर करावा. शेतकऱ्यांच्या बाधित क्षेत्रात असणारी इतर मालमत्ता त्याचे योग्य मूल्यांकन करावे .

काही शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास विरोध दर्शवला असून या शक्तीपीठ महामार्गाचा जनतेस कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. या रस्त्यामुळे व्यापारपेठ वाढेल असेही नाही. हा शक्तीपीठ महामार्ग 100 फूट रुंदीचा व पंधरा ते वीस फूट उंचीवरून जाणार असल्याने याचा कोणताच फायदा होणार नाह. इतर रस्त्यावरून या शक्तीपीठ महामार्गावर जाण्यासाठी खूप अडचणी आहेत. लांब अंतरावर प्रवेशद्वार आहेत. कुटुंबाच्या विभागणीमुळे जमिनीचे विभाजन झाले असल्याने शेतकऱ्यांकडे अल्प जमीन शिल्लक आहे. शिल्लक जमीन शक्तिपीठ महामार्गात गेल्यास शेतकऱ्यांनी राहायचे कुठे? खायचे काय? हा प्रश्न असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गास संमिश्र प्रतिसाद असून काही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

चौकट ३)

 सांगोला तालुक्यातील शेतकरी बांधवांचा शक्तीपीठ महामार्गास तीव्र विरोध आहे .आपल्या हक्काच्या जमिनी रस्त्यात गेल्यास भविष्यात जगायचे कसे ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे .जमिनीच्या दराबाबत व मिळणाऱ्या पैशाबाबत कोणीही विचार न करता शक्तीपीठ महामार्गास सर्वांनी एकजुटीने विरोध करूया .रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग असताना या शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय? असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुक्यातील शेतकरी शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाहीत. अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत प्रशासनाने शेतकऱ्यांना अंधारात ठेवले आहे .शासन कोणतीही ठाम भूमिका स्पष्ट करीत नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा शक्तीपीठ महामार्ग नुकसानकारक आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी या शक्तीपीठ महामार्गास एकजुटीने विरोध करणार असून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी मांडली असून या विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे..

          :पत्रकार रविराज शेटे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत