शेती महामंडळातील कामगारांना राहण्यासाठी जागा; घरकुल बांधून देण्याची रत्नपुरी मळ्यातील कामगारांची मागणी.
प्रतिनिधी, संतोष कदम.
वालचंदनगर :- शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी घरे नसल्याने हे कामगार कुटुंबासह जीर्ण व धोकादायक खोलीत राहत आहेत. खोली वरील पत्रे गंज चढुन सडलेले आहे. भिंती जीर्ण होऊन पडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेकडो कामगारांच्या कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. एमआयडीसीला जागा हस्तांतरित करण्याअगोदर कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा देऊन घरकुल बांधून देण्याची मागणी रत्नपुरी येथील शेती महामंडळाच्या कामगारांनी शासनाकडे केली आहे.
इंदापूर तालुक्यातील रत्नपुरी येथे शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन आहे. याच परिसरात आठदारे, नवदारे, उखळमाळ या भागात शेती महामंडळाचे कामगार महामंडळाच्या कालबाह्य, जीर्ण झालेल्या वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहत आहेत.
शेती महामंडळाने पीक पाणी बंद केल्यापासून या कामगारांची राहण्यासाठी दोन गुंठे जागा देण्याची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षापासून महामंडळाचे कामगार व त्यांचे वारसदार शासनाकडे ही मागणी करत आहेत. शासनाने खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटप करताना ही कामगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणणे कामगारांचे आहे, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जंक्शन मिनी एमआयडीसी ची घोषणा करण्यात आली असून त्यासाठी शेती महामंडळाची जमीन देण्याचे प्रास्ताविक करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांच्या राहण्यासाठी जागेचा प्रश्न न सोडवताच शासनाने घेतलेल्या या निर्णयाला कामगारांचा विरोध होत आहे.
याबाबत येथील कामगारांनी इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांना लेखी निवेदन दिले. शासनाने अगोदर शेती महामंडळाच्या कामगारांना राहण्यासाठी दोन गुंठे जागा, रमाई आवास योजनेतून घरकुल द्यावे व मगच एमआयडीसी करिता जागा द्यावी. अन्यथा लवकरच मंत्रालयावर बिह्राड मोर्चा काढण्याचा इशारा या निवेदनात दिला आहे. निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत