जि. प. प्राथमिक शाळा बुरुंगलेवाडी (सोनलवाडी) शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे ...
स्नेहसंमेलन म्हणजे एक रम्य पहाट, गाण्यांनी गजबजलेली वादळ वाट, सोनेरी क्षणांची एक आठवण,सुखदुःखाची गोड साठवण अशीच गोड साठवण करणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरुंगलेवाडी (सोनलवाडी) ता. सांगोला, जि .सोलापूर या शाळेचे बहारदार स्नेहसंमेलन नुकतेच संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारामध्ये इशस्तवन, कोळीगीत, शेतकरी गीत, साक्षरता गीत, आई बापाची महती सांगणारे संस्कार गीत, विनोदी नाटिका, बालगीते, वाघ्या मुरळी गीत, शालेय संस्कार गीते, लोकगीते अशा महाराष्ट्रातील लोककलेचा बहुरंगी कार्यक्रम सादर करून उपस्थिताना मंत्रमुग्ध केले.
पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्तव्यदक्ष गटशिक्षण अधिकारी सुयोग नवले हे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्याचबरोबर केंद्रप्रमुख अस्लम इनामदार, गावच्या सरपंच रुक्मिणी बुरुंगले, रामहरी बुरुंगले, फांजर चित्रपटाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक देवदत्त धांडोरे, तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे नेते व शिक्षक वृंद यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. या सर्व मान्यवरांनी मुलांच्या कलेला भरभरून दाद दिली.
उपस्थितानी बालकलाकारांना प्रोत्साहन देत त्यांच्यावर बक्षीसाचा वर्षाव केला तसेच महादेव जालिंदर शिंदे यांनी शाळा विकासासाठी 11 हजार रुपयांची देणगी दिली.
शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक विलास नवले सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले. शाळेतील सहशिक्षिका सविता राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या दोघांनीही हा बहारदार कार्यक्रम बसविण्यासाठी विशेष कष्ट घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस.एम.सी. अध्यक्ष सिताराम बुरुंगले, उपाध्यक्ष दिलीप शेजाळ सर्व सदस्य पालक व ग्रामस्थ, तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे खूप सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेश कोळी सर, डि.के. जाधव सर, कवयित्री व योगशिक्षिका सौ. उज्वलाताई बुरुंगले यांनी केले. कार्यक्रमासाठी संगीत साथ सुनील कसबे व बाळासो भोसले यांनी दिली. शाळेतील चिमुकल्यांनी आपल्या सुंदर कलाविष्काराने उपस्थितांची वाहवा मिळविली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत