Breaking News

श्री वर्धमान विद्यालयाचा 90वा वर्धापन दिन उत्साहात साजरा


 विशेष प्रतिनिधी - संतोष कदम.

वालचंदनगर :- ( ता. इंदापूर ) येथील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा 90 वा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्था अध्यक्ष मकरंद वाघ यांची निवड करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणातून वाघ यांनी विद्यालयाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा राखल्याबद्दल समाधान व्यक्त केले. 

या कार्यक्रम प्रसंगी वालचंदनगर इंडस्ट्रीज मधील विजय धामणकर, आप्पा मानकरी ,उपप्राचार्य रामनाथ नाकाडे, पर्यवेक्षक अनिल उबाळे, बीसीएचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर उपस्थित होते. 

यावेळी शाळा समितीचे माजी अध्यक्ष अमोल गेंगजे, प्राचार्य हनुमंत कुंभार, उपमुख्याध्यापक अरुण निकम यांची भाषणे झाली. गेंगजे यांनी सदिच्छा व्यक्त करताना माजी विद्यार्थी व माजी अध्यक्ष म्हणून विद्यालयाबद्दल जिव्हाळा व आपुलकी असल्याचे मत व्यक्त केले तर प्राचार्य हनुमंत कुंभार यांनी जगाच्या कानाकोपऱ्यात वर्धमानचे विद्यार्थी असल्याचे मत व्यक्त करीत आत्ताच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी कष्ट व अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले तर निकम यांनी 1988 ते 2024 पर्यंतचा शालेय गुणवत्तेचा आढावा घेतला व हे विद्यालयाचा मान वर्धन करणारे असून भविष्यातही गुणवत्तेत येथील विद्यार्थी कोठेच कमी पडणार नसल्याचा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रास्तविकेतून प्रा. पवार यांनी 18 जून 1934 मध्ये दोन खोल्यात सुरू झालेल्या विद्यालयाचा ऐतिहासिक वारसा अधोरेखित करीत श्रीमानशेठ वालचंद हिराचंद यांच्या दूरदृष्टीचे व कल्पकतेचे कौतुक केले.

 या कार्यक्रम प्रसंगी सुमारे दीड हजार विद्यार्थी, पालक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ऐवळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत