जि.प. प्रा. शाळा दिवाण मळा आजनाळेचा यशाचा झेंडा उंचावला – पायल विभुतेची शासकीय पदावर निवड
सांगोला, प्रतिनिधी:
आजच्या काळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढते आकर्षण दिसत असले, तरी मराठी शाळांची गुणवत्ता आणि संस्कारमूल्ये अजूनही तितकीच प्रभावी आहेत, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जि. प. प्रा. शाळा दिवाण मळा, आजनाळे येथील विद्यार्थिनी कुमारी पायल विभुते हिने आपल्या मेहनतीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेत ती Tax Assistant आणि Revenue Assistant या शासकीय पदांसाठी निवड झाली आहे.
पायल ही सांगोला तालुक्यातील दिवाण मळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची माजी विद्यार्थिनी असून, तिच्या यशामागे शाळेतील शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. विशेषतः कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. सोमनाथ हरिभाऊ पोरे सर यांच्या मार्गदर्शनामुळे पायलने स्पर्धा परीक्षेची तयारी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिने अभ्यासाचे योग्य नियोजन करून आपले ध्येय साध्य केले.
मराठी माध्यमाच्या शाळांमधून घडणाऱ्या विद्यार्थ्यांची ही एक प्रेरणादायी कथा आहे. अशा शाळांमधून केवळ शिक्षणच नव्हे, तर संस्कार, चिकाटी आणि जिद्द यांची जोपासना होते, हे पायलच्या यशातून स्पष्ट होते.
दरम्यान, पायलच्या या यशाबद्दल जि. प. प्रा. शाळा दिवाण मळा येथे भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे हितचिंतक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पायलच्या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून, ही बाब शाळेसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
पायल विभुते हिचे यश हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत