पायोनिअर पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा – मुलांच्या आनंदाने उजळला परिसर
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क:
पायोनिअर पब्लिक स्कूलमध्ये बालदिनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण उत्सव संपन्न झाला. आज शाळेत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या या दिनाचे महत्त्व सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. “चाचा नेहरू” यांच्या बालप्रेमाची आठवण करून देत मुलांनी कुतूहलाने कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक आदरणीय अनिल येलपले सर, शाळेचे प्रिन्सिपल श्री. सतीश देवमारे सर यांच्या हस्ते करण्यात आलेल्या दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. दररोज विद्यार्थ्यांकडून होणारी सकाळची सभा आज खास शिक्षकांनी मिळून घेतली आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात एक वेगळा आणि आनंददायी अनुभव देणारी ठरली.
यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाने भरलेला सुंदर कार्यक्रम सादर केला. सौ. अश्विनी जाधव मॅडम यांनी बालदिन साजरा करण्यामागचे महत्त्व स्पष्ट केले. सौ. प्रतिक्षा येलपले मॅडम आणि कु. शेजल अदलिंगे मॅडम यांनी मुलांसाठी छोटी परंतु अत्यंत मनोरंजक नाटुकली सादर केली. वातावरण अधिक रंगतदार करत सौ. रुपाली गायकवाड व तनुजा ढगे मॅडम यांनी गोड बडबड गीत सादर केले. सर्व शिक्षकांनी मिळून सादर केलेल्या नृत्यावर विद्यार्थ्यांनी उत्साहाने दाद दिली.
मुलांसाठी आयोजित केलेल्या फनी गेम्समुळे शाळा हास्याने दुमदुमून गेली. विद्यार्थ्यांनी खेळांचा मनसोक्त आनंद घेतला आणि विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या विशेष दिनाचे औचित्य साधत शाळेतील सहावीतील विद्यार्थ्यांची नंदादीप नेत्रालय सांगोला यांच्या तर्फे डोळे तपासणीही करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाला एक सुंदर बांधणी देत प्रियांका मोहिते मॅडम यांनी प्रभावी आणि उत्साही सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रिन्सिपल सतीश देवमारे सर यांनी “चांगली मुले कशी घडतात आणि जीवनात मूल्यांचे महत्त्व” याबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या आनंदमयी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शाळेच्या अकॅडमिक इंचार्ज मृणाल राऊत आणि सांस्कृतिक प्रमुख सौ. रुपाली गायकवाड मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. बालदिनाचा हा उत्सव विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि शिक्षकांसाठीही अविस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत