Breaking News

मंगळवेढा येथे चालक दिन साजरा


विशेष प्रतिनिधी :येताळा खरबडे

मंगळवेढा पोलीस स्टेशनच्या वतीने चालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वरिष्ठांच्या सुचनांनुसार मा. डीवायएसपी डॉ. शिवपुजे सो व मा. पोलीस निरीक्षक श्री. बोरीगीड्डे सो यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशनचे पोसई श्री. पिसे सो, वाहतूक अंमलदार पोहेकॉ/1421 यादव, पोकॉ/1068 साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने सर्व चालकांना पुष्पगुच्छ देऊन चालक दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी पोसई पिसे सो यांनी चालकांच्या कार्याचे कौतुक करताना “चालक म्हणजे देशाचे दुसरे सैनिकच आहेत!” असे गौरवोद्गार काढले. त्यांनी चालकांच्या शिस्तबद्ध आणि जबाबदार कामगिरीमुळे समाजजीवन सुसह्य होत असल्याचे सांगून आभार मानले.

वाहतूक अंमलदार पोहेकॉ यादव यांनी उपस्थित सर्व चालकांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. पोलिस प्रशासनाकडून चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले.

या प्रसंगी मोटर चालक-मालक संघटना, मंगळवेढा यांचे पदाधिकारी तसेच चालक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पोलिस प्रशासन आणि चालक यांच्यातील परस्पर सहकार्य आणि संवाद वृद्धिंगत करणारा हा उपक्रम ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत