Breaking News

सांगोला तालुक्यातील गणेश मंडळांनी विधायक व सामाजिक उपक्रम राबवावेत: त्यासाठी पोलीस स्टेशनकडून स्पर्धा व बक्षिसांचे नियोजन : उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे..! तालुक्यातील गणेश मंडळांनी पोलीस स्टेशनकडे नोंदणी करावी ; डी.जे मुक्त गणेशोत्सव साजरा करा


 सांगोला /प्रतिनिधी: 

          सांगोला तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे अमलबजावणी करून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये परवानगी व नाव नोंदणी करावी. सध्या पावसाळी वातावरण असल्याने गणेश मंडळाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत सर्व जबाबदारी गणेशोत्सव मंडळांनी घ्यावी. गणेश मंडळांनी कोणत्याही प्रकारचा विघातक मजकूर प्रसिद्ध करू नये. नाव नोंदणी झालेल्या गणेश मंडळाकडून विधायक , सामाजिक ,पर्यावरण विषयक, सांस्कृतिक, हरितवारी,जलतारा ,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर , वृक्षारोपण,कार्यक्रम राबवण्यात यावेत. पोलीस स्टेशनच्यावतीने गणेशोत्सव मंडळांच्या उपक्रमावर आधारित स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस वितरण केले जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत डीजेला परवानगी देण्यात येणार नाही याची गणेश मंडळांनी नोंद घ्यावी .आवाजाचे व नियमांचे बंधन पाळले पाहिजे. कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य वर्तन केल्यास कारवाई केली जाईल. पोलीस पाटलांनी गाव पातळीवरती दक्षता घ्यावी. 5 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद हा मुस्लिम बांधवांचा सण असल्याने दोन्ही सण शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. सांगोला तालुक्यासाठी गणेश मंडळांना एकूण 24 बक्षिसे वितरित केली जाणार आहेत अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांनी सांगोला येथे दिली. 

सांगोला पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सव 2025 साठी पदाधिकारी व शांतता समितीची बैठक पंचायत समिती बचत भवन सांगोला येथे सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. यावेळी उपभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे व मान्यवरांनी गणेश उत्सवासंदर्भात मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


यावेळी  गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अशोक मुलगीर, महावितरणचे अधिकारी कोरे,हाजी शबीरभाई खतीब, डॉ. मानस कमलापूरकर, बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे, पत्रकार रवींद्र कांबळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंदभाऊ केदार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गणेश मंडळांनी शांततेत गणेशोत्सव साजरा करावा.  सामाजिक, पर्यावरण विषयक उपक्रम राबवले जावेत. गणेशोत्सव काळात वारंवार विद्युत पुरवठा खंडित करू नये. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत. गणेशोत्सव काळात वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा. 

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे, तालुक्यातील पोलीस पाटील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर, नागरिक व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सांगोला तालुक्यातील गणेशोत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्याची सर्वांची जबाबदारी आहे. कोणीही शिस्त बिघडवू नये .गणेशोत्सव मंडळांनी विधायक उपक्रम राबवावेत. त्यासाठी पोलीस स्टेशनच्या वतीने स्पर्धा आयोजित केलेली असून विविध स्तरावर  24 बक्षिसांचा समावेश आहे. त्यामध्ये  गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा. 5 सप्टेंबर रोजी महम्मद पैगंबर जयंती असल्याने  मुस्लिम समाज बांधवांनी व गणेशोत्सव मंडळांनी शांततेत आपापले सण पार पाडावेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने गणेश मुर्तीची काळजी घ्यावी.  गणेशोत्सव मंडळांनी नियमानुसार विद्युत कनेक्शन घ्यावे. गणेशोत्सवाच्या दरम्यान डीजेला परवानगी नसल्याने कोणीही डीजे बाबत विचार करू नये. त्या ठिकाणी पारंपारिक वाद्याला प्राधान्य द्यावे. मिरवणुका शांततेत व वेळेत पार पाडाव्यात.‌ सांगोला पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यात शहरासाठी तीन बक्षिसे व चौकीनुसार व बीटनुसार 21 बक्षिसांचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता गणेश उत्सव मंडळानी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे: विनोद घुगे, पोलीस निरीक्षक सांगोला. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

 गणेश मंडळांनी गणेश उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावी. सामाजिक उपक्रम राबवावेत. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर गणेशउत्सव काळात  रस्त्यावर गणेश मंडळांनी वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी. मिरवणुकी दरम्यान शांतता ठेवावी :  संतोष कणसे, तहसीलदार सांगोला. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळाने कागदपत्रांची पूर्तता करून नाव नोंदणी करावी. गणेशोत्सव मंडळांनी समाजप्रबोधन करावे. गणेशउत्सव शांततेत व नियोजनपूर्वक पार पाडावा. गणेशोत्सवासाठी फार मोठे मंडप तयार करू नयेत. गणेशोत्सव मंडळांनी रस्त्यावरती गणपती स्थापन करत असताना रहदारीचा विचार करावा. गणेशोत्सव शांततेत सुव्यवस्थेत पार पाडण्यासाठी नगरपालिका प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल: डॉ. सुधीर गवळी ,मुख्याधिकारी सांगोला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत