Breaking News

स्तनपानामुळे बाळाच्या रोग प्रतिकार शक्तीत वाढ होते ; डॉ अशोक कलाल


 अजनाळे :सचिन धांडोरे   

स्तनपान हा केवळ आहाराचा विषय नाही, तर आई आणि बाळ यांच्यातील जिव्हाळा, प्रेम आणि विश्वासाची नाळ आहे. बालकाच्या संपूर्ण आरोग्याचा पाया हा जन्माच्या पहिल्या दिवसापासून घातला जातो, आणि त्यात स्तनपानाची भूमिका सर्वात महत्त्वाची असते.स्तनपानामुळे बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होत असल्याचे मत आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल यांनी व्यक्त केले


काल शनिवार दि २ ऑगस्ट रोजी अजनाळे अंगणवाडी केंद्र क्रमांक २ येथे राष्ट्रीय स्तनपान सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी सारिका सावंत -धांडोरे, आरोग्य सेविका सिंधू गडदे, ज्योती येलपले, पल्लवी धांडोरे, आरती येलमार, पुष्पा पाटील,करूणा धांडोरे,रतन धांडोरे यांच्यासह अन्य महिला गावातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना डॉ कलाल म्हणाले की, स्तनपानाचे वैज्ञानिक व आरोग्यदायी फायदे उलगडून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, जन्मानंतरच्या पहिल्या तासात आईने बाळाला स्तनपान सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिल्या सहा महिन्यांत फक्त आईचे दूध द्यावे, त्यात पाणी, साखरपाणी, दूध पावडर किंवा कोणताही बाहेरील पदार्थ देऊ नये, कारण आईच्या दुधात बाळाच्या सर्व गरजांचे पोषण घटक आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक मुबलक प्रमाणात असतात.

तसेच, ६ महिन्यानंतर बालकाला पूरक आहारासोबत स्तनपान सुरू ठेवणे आवश्यक आहे, कारण यामुळे बालकाची वाढ आणि विकास वेगाने होतो. स्तनपानामुळे बालकात अतिसार, न्यूमोनिया, कुपोषण यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. मातेच्या आरोग्यासाठीही स्तनपान फायदेशीर ठरते – प्रसूतीनंतर रक्तस्राव कमी होतो, गर्भाशय लवकर पूर्वस्थितीत येतो तसेच स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंगणवाडी सेविका सारिका सावंत यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत