पायोनियर पब्लिक स्कूल य.मंगेवाडी येथे पारंपरिक दिंडी सोहळा उत्साहात साजरा
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
हिंदू संस्कृतीतील श्रद्धेचा आणि भक्तीचा पर्व असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त पायोनियर पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. या निमित्ताने शाळा संकुलात भक्तिभाव, पारंपरिकता आणि सांस्कृतिक एकतेचे सुंदर दर्शन घडले.
कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. याप्रसंगी पायोनियर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर, पायोनियर पब्लिक स्कूलचे प्रिन्सिपल सतीश देवमारे सर, पायोनियर गुरुकुलचे प्राचार्य डॉ. अमोल रणदिवे सर, शाळेच्या अकॅडमिक इंचार्ज मृणाल राऊत मॅडम हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करत, टाळ, पताका घेऊन "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" या गजरात शिस्तबद्ध पद्धतीने मंगेवाडी गावाकडे पायी दिंडी काढली. या दिवशी विद्यार्थ्यांनी संतांची व विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा साकारून भक्तिपर भावनिर्मिती केली.
यातील मुख्य आकर्षण ठरले ते मुलींच्या पारंपरिक टाळ नृत्याचे सादरीकरण. या नृत्याविष्काराने संपूर्ण दिंडी अधिक आकर्षक आणि भक्तिमय झाली.
मंगेवाडी गावातील मंदिरात पोहोचल्यावर मृदुंगाच्या गजरात, विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एकत्र येत फुगड्या घालून व भजन सादर करून वातावरण भक्तिरसात न्हावून टाकले. गावातील वारकऱ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत सामूहिक भजन सादर केले.
हा भक्तिमय आणि सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पायोनियर पब्लिक स्कूल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्यांचे उत्कृष्ट नियोजन व पालन केले. त्यांच्या मेहनती व समर्पणामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.
पायोनियर पब्लिक स्कूल ही शाळा केवळ शिक्षणपुरती मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीची नाळ, परंपरेची ओळख व सामाजिक मूल्यांची रुजवणूक घडवण्यासाठी नेहमीच अशा सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करत असते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत