पायोनियर शैक्षणिक संकुल य.मंगेवाडी येथे भव्य दिंडी सोहळा संपन्न
सांगोला गौरव न्यूज नेटवर्क
आषाढी एकादशी ही हिंदू संस्कृतीतील एक पवित्र तिथी असून भक्तिभाव, समर्पण आणि सामाजिक एकतेचे प्रतीक मानली जाते. या दिवशी लाखो वारकरी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी वारी करत जातात.
याच पार्श्वभूमीवर पायोनियर शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने पारंपरिक वेशभूषा परिधान करत, टाळ-पताका घेऊन रिंगण करत सहभाग घेतला. लहान मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी आणि विविध संतांच्या वेशभूषा साकारून भक्तिभावाने वातावरण भारावून टाकले. विशेषतः मुलींच्या टाळ नृत्याच्या सादरीकरणाने दिंडीचे प्रमुख आकर्षण निर्माण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात पालखी पूजनाने झाली. यावेळी पायोनियर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आदरणीय अनिल येलपले सर, पायोनियर पब्लिक स्कूलचे प्राचार्य सतीश देवमारे सर, पायोनियर निवासी गुरुकुलचे प्राचार्य डॉ. अमोल रणदिवे सर, अकॅडमिक इंचार्ज मृणाल राऊत मॅडम, गर्ल्स हॉस्टेलच्या HOD रणदिवे मॅडम, तसेच इंग्रजी व सेमी इंग्रजी विभागाचे HOD रूपनर सर, बाबर सर, राऊत मॅडम आणि येलपले मॅडम हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" अशा गजरात, हातात टाळ-पताका घेत, भक्तिभावाने पायी चालत मंगेवाडी गावाकडे प्रस्थान ठेवले. त्यांच्या एकसंध गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. या भावमय वारीत सहभागी होत ते सर्वजण मंगेवाडी गावातील मंदिरात पोहोचले.
मंदिर परिसर मृदुंगाच्या निनादाने दुमदुमून गेला, आणि त्या तालावर शिक्षक व विद्यार्थ्यांनी टाळ धरत फुगड्या घालून भक्तिभावाने नृत्य केले. गावातील वारकऱ्यांसह सर्वांनी सामूहिक भजनांचा आनंद घेतला.
हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पायोनियर संकुलातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रमपूर्वक जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांचे समर्पण आणि संघभावना या कार्यक्रमाच्या यशामागील खरी ताकद ठरली.
अशाच आपल्या परंपरा, सण-समारंभ यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, भारतीय संस्कृतीतील मूल्यांचा वारसा त्यांच्या मनात रुजावा, यासाठी पायोनियर शैक्षणिक संकुल नेहमीच विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करत असते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत