सांगोला गौरव न्युज नेटवर्क:
खंडोबा बहुउद्देशीय संस्था संचलित पायोनियर संकुल, यलमार मंगेवाडी, गेल्या दोन दशकापासून विद्यार्थ्यांच्या सेवेत असून संस्थापक श्री अनिल येलपले यांच्या नियोजनात व सर्व स्टाफच्या कष्टात सातत्याने ते बहरत आहे. गेल्या काही वर्षापासून सुरू असलेल्या मुलांच्या निवासी गुरुकुलच्या उत्तुंग निकालाच्या व गुणवत्तेच्या बळावर पायोनियरने पालकांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विविध स्पर्धा परीक्षा, जिल्हा व राज्यपातळीवरील विविध क्रीडा स्पर्धा यामध्येही पायोनियर गुरुकुलची मुले चमकलेली आहेत. मुलांप्रमाणे मुलींनाही या गुणवत्तेचा व सुविधांचा लाभ व्हावा अशी पालकांतून सातत्याने मागणी होत होती. त्याच अनुषंगाने शनिवार दिनांक 7 जून रोजी पायोनियर मुलींचे निवासी गुरुकुल या नव्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून यलमार मंगेवाडी गावच्या विद्यमान सरपंच सौ.शीतल भंडगे लाभल्या होत्या. माजी सरपंच दत्तात्रय मासाळ यांनी संकुलाच्या मदतीस सदैव तत्पर असल्याची ग्वाही देत पायोनियरच्या या नव्या शाखेस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पायोनियर संकुलाचे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले होते. "सांगोला तालुक्यामध्ये मुलींच्या निवासी गुरुकुलची संकल्पना ही मुलींच्या शिक्षणातील अतिशय प्रभावी व फायदेशीर संकल्पना असून त्यामुळे मुलींना पूर्णवेळ शैक्षणिक वातावरणात राहून स्वतःची गुणवत्ता वाढवण्याची संधी मिळणार आहे", असे संस्थापक अध्यक्ष अनिल येलपले सर त्यांच्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले. प्रशालेच्या माजी विद्यार्थिनींनी पायोनियर संकुलाच्या गुणवत्तेबद्दल तोंड भरून कौतुक केले व जास्तीत जास्त मुलींनी या गुरुकुलचा फायदा घ्यावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमास पायोनियर पब्लिक स्कूलचे प्राचार्य सतीश देवमारे सर, पायोनियर गुरुकुलचे प्राचार्य डॉ.अमोल रणदिवे सर, गुरुकुलच्या विभागप्रमुख सौ.ज्योती रणदिवे मॅडम, राज माळी सर, सोमनाथ आदलिंगे सर, अजित रणदिवे सर,श्री. सोमनाथ विभुते, श्री. सुभाष चौगुले, श्री.समाधान सूर्यवंशी तसेच मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा होटे मॅडम यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री.दिलीप जावीर सर यांनी केले. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा