Breaking News

श्री भोजलिंग यात्रेनिमित्त रानमळा- चोपडी येथे विविध कार्यक्रम संपन्न


सांगोला /प्रतिनिधी 

              सांगोला तालुक्यातील रानमळा- चोपडी येथे गुरुवार दि.10 एप्रिल ते रविवार दि. 13 एप्रिल 2025 या कालावधीत श्री भोजलिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक तसेच भव्य रेकॉर्ड स्पर्धा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. सांगोला तालुक्याचे लोकप्रिय मा. आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कृष्णा संदिपान बाबर या व्यासपीठाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम , बाल कलाकारांचा लेझीम खेळ संपन्न झाला. शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी भारुड सम्राट कृष्णा महाराज जोगदंड लातूरकर यांचा भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाला. शनिवार दि. 12 एप्रिल रोजी ह.भ. प. गणेश  महाराज डांगे यांच्या सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रविवार दि. 13 एप्रिल 2025 रोजी  भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील डान्स कलाकारांचा सहभाग होता. यशस्वी ठरलेल्या डान्स कलाकारांना 1 हजारापासून 15 हजारापर्यंत बक्षिसे देण्यात आली. यात्रेनिमित्त चार दिवस उपस्थित भाविक -भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते .श्री भोजलिंग यात्रा गेल्या अनेक वर्षापासून चैत्री पौर्णिमेला आयोजित केली जात असून भोजलिंग यात्रा कमिटीच्या वतीने यात्रा  भरवण्यात येते. श्री भोजलिंग यात्रेनिमित्त समाजातील अनेक मान्यवर , तसेच दानशूर व्यक्तींनी आपआपल्या परीने यात्रेसाठी सहकार्य, मदत व देणगी दिली.  यात्रा यशस्वीपणे पार पडण्यासाठी भोजलिंग यात्रा कमिटी, युवावर्ग, चोपडी ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. संजय बाबर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व यात्रेविषयी मनोगत व्यक्त केले. राहुल बाबर  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यात्रेनिमित्त उपस्थित भाविक भक्तांचे आभार इंजिनीयर गणेश बाबर यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत