Breaking News

अनकढाळ ग्रामपंचायत सरपंच पोटनिवडणूक : बिनविरोध निवडीसाठी गाव एकवटले


 प्रतिनिधी- सांगोला 

अनकढाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख दि. १३ एप्रिल २०२६ आहे. अर्जांची पडताळणी व माघार घेण्याची अंतिम तारीख दि. १७ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

यापूर्वी गावातील पहिले लोकनियुक्त सरपंच दर्याप्पा केराप्पा बंडगर यांनी आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करून स्वेच्छेने राजीनामा दिला होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच दिगंबर बंडगर यांनी सक्षमपणे सांभाळली.

सध्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने गावात उत्साहाचे वातावरण असून, दि. १० एप्रिल २०२६ अखेरपर्यंत तीन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विविध गटांकडून सकारात्मक चर्चांना वेग आला असून, गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एकमत साधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अनकढाळ गावात परंपरेने ज्यांना यापूर्वी कोणतेही संविधानिक पद मिळाले नाही, अशा कुटुंबाला संधी देण्याची गौरवशाली परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत कार्यरत असलेले शंकर बंडगर यांच्या कुटुंबातील उमेदवाराला संधी मिळावी, यासाठी ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दहा वर्षांपासून त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत जनतेशी दृढ नाते निर्माण केले आहे.

तसेच, परिवहन खात्यातील निवृत्त अधिकारी रंगनाथ बंडगर यांच्या कुटुंबातील उमेदवारालाही संधी मिळावी, अशी मागणी काही गटांकडून होत असून, सर्वच स्तरांतून समन्वयाचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, शेतकरी कामगार पक्षाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख (भाई) यांनी ही पोटनिवडणूक केवळ दीड वर्षांसाठी असल्याने अनावश्यक राजकारण टाळून बिनविरोध निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे.

सध्या गावातील मान्यवर, पदाधिकारी व नागरिक एकत्र येत बिनविरोध निवडणूक घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे गावात ऐक्य, समन्वय आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण झाले आहे.

आता सर्वांचे लक्ष दि. १७ एप्रिल २०२६ या अर्ज माघारीच्या अंतिम तारखेकडे लागले असून, त्या दिवशी अनकढाळच्या पुढील नेतृत्वाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत