चोपडी येथील गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने रस्त्यावरून प्रेत न्यायालाही दोन फूट पाण्यातून काढावा लागला मार्ग ; मरणानंतरही प्रेताला सोसाव्या लागतात यातना: ग्रामस्थातून व्यक्त केला जातोय संताप..! नाझरा मंडलमध्ये अतिवृष्टी झाल्याचे प्रशासन मान्य करायला तयार नाही
नाझरे/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी गावातील गावतलाव अतिवृष्टीने पूर्ण भरून सांडव्यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या तलावा शेजारील रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या अनेक वाड्या- वस्त्यांचा संपर्क तुटला आहे. येदूचामळा, रानमळा, हवालदार मळा, मेखलेमळा, सोमेवाडी, गव्हाणे मळा, पयाजीमळा, चौगुलेमळा, यादव मळा, आदी वाडीवस्तीकडे जाणारा हा एकमेव मार्ग होता. तो पाण्याखाली गेला असून या रस्त्यावर दोन अडीच फूट पाणी आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना गावाकडे व घराकडे ये -जा करण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने मोठे हाल होत आहेत. पाण्यातूनच मार्ग काढावा लागत आहे. मृत व्यक्तीचे प्रेत न्यायलाही या पाण्यातून मार्ग काढण्याची वेळ चोपडी गावातील ग्रामस्थावर आल्याने याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. मरणानंतर ही प्रेताला सोसाव्या लागतात इथे यातना. येथील परिस्थिती पाहता तलावामध्ये येणारे पावसाचे पाणी जास्त असून सांडव्यातून वाहणारे पाणी कमी प्रमाणात वाहत आहे .त्यामुळे या मार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पाण्यातून ग्रामस्थांना मार्ग काढावा लागत आहे. शालेय विद्यार्थी व वृद्ध ग्रामस्थ, महिला यांना पाण्यातून जायला भीती निर्माण होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे हाल कोण दूर करणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या रस्त्याची उंची वाढवण्याची गरज असून प्रशासनाने तात्काळ रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.
तरीही प्रशासन म्हणते नाझरा मंडलमध्ये अतिवृष्टी झाली नाही. अतिवृष्टीतून नाझरा मंडळ वगळले गेले आहे. प्रशासनाने नाझरा मंडलचा त्वरित अतिवृष्टीमध्ये समावेश करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नाझरे परिसरातील ग्रामस्थ व चोपडी ग्रामस्थातून होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत