Breaking News

चिणके येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उत्साहात शुभारंभ...


 अजनाळे सचिन धांडोरे;

चिणके (ता. सांगोला) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. आज बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर सौ. स्मिता पाटील यांच्या शुभहस्ते या अभियानाचे उद्घाटन झाले.

याप्रसंगी सांगोला पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री. उमेशचंद्र कुलकर्णी, सरपंच नाथा खंडागळे, उपसरपंच मोहन मिसाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील म्हणाल्या की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सक्षमपणे राबवा. लोकहिताची लोकोपयोगी कामे प्राधान्याने करा.” तसेच चिणके ग्रामपंचायतीने राबविलेल्या नावीन्यपूर्ण योजनांचे त्यांनी कौतुक केले व ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.

गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांनी अभियानाची सविस्तर माहिती देत, “लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी पंचायत समितीचे सर्व अधिकारी एक दिवस ग्रामपंचायतीला येऊन प्रत्यक्ष समस्या सोडवतील,” असे आश्वासन दिले.कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केली. सूत्रसंचालन राजकर (अंगणवाडी सेवक) यांनी तर आभार प्रदर्शन व विशेष योजनांची माहिती ग्रामपंचायत सदस्य विनायक मिसाळ यांनी दिली.

या कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी अण्णासाहेब भडंगे, महसूल अधिकारी बागमोडे, नोडल अधिकारी टकले ,अंगणवाडी प्रकल्प संचालक, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक  बंडगर गुरुजी, हनुमंत पवार गुरुजी, ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश मिसाळ, पोलीस पाटील पवार, माजी सैनिक संघटना पदाधिकारी, बचत गटांचे प्रतिनिधी, बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा अधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत