Breaking News

सांगोला तालुक्यात उमेद अभियानांतर्गत महिला प्रभाग संघांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न


 सांगोला प्रतिनिधी

सांगोला – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सात महिला प्रभाग संघांची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सक्षम महिला प्रभाग संघ कडलास, नवजीवन महिला प्रभाग संघ जवळा, जयजवान महिला प्रभाग संघ कोळा, गरुड झेप महिला प्रभाग संघ महूद बु., सत्यमेव महिला प्रभाग संघ एखतपूर, शिवतेज महिला प्रभाग संघ नाझरे तसेच उज्वल महिला प्रभाग संघ घेरडी या सात संघांचा समावेश या सभेमध्ये होता.

सभेचे प्रस्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक मा. श्री. आण्णा अवताडे यांनी सादर केले. वार्षिक सभेचे उद्दिष्ट, गरज व महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन तालुका व्यवस्थापक (IBCB) मा. श्री. अमोल सावंत यांनी केले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. चंद्रशेखर जगताप (प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सोलापूर), मा. सौ. जयमालाताई गायकवाड (जिल्हा परिषद अध्यक्षा, सोलापूर), मा. सचिन चवरे (जिल्हा अभियान व्यवस्थापक, उमेद सोलापूर), मा. वसंत फुले (सहायक गटविकास अधिकारी, पं. स. सांगोला), मा. संदीप देवकाते (तालुका आरोग्य अधिकारी, पं. स. सांगोला), मा. अशोक कणगी (FLC बँक ऑफ इंडिया) आणि मा. अविनाश रूपनवर (शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, अजनाळे) हे उपस्थित होते.


प्रमुख पाहुण्यांनी महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मा. प्रकल्प संचालक श्री. जगताप यांनी महिलांना व्यवसायाभिमुख होऊन आर्थिक स्वावलंबन साधण्याचे आवाहन केले. तर मा. सचिन चवरे यांनी अभियानाच्या माध्यमातून “लखपती दीदी” बनण्याच्या दिशा दाखविल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. जयमालाताई गायकवाड यांनी महिलांनी धाडसाने पुढे येऊन रोजगारनिर्मितीच्या संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.


या सभेमध्ये सर्व प्रभाग संघांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संघाचे भौतिक व आर्थिक अहवाल सादर केले आणि पुढील वर्षासाठीच्या कार्ययोजनेची मांडणी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत महादेवकर यांनी कुशलतेने केले.


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्रभाग समन्वयक, कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक, सीआरपी, पशुसखी, कृषीसखी, उद्योगसखी, एम-सीआरपी, मास्टर सखी, बँक सखी, एफएलसीआरपी व बीडीएसपी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन तालुका व्यवस्थापक (FI) श्री. सुधीर पिसे यांनी केले.

या वार्षिक सभेद्वारे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा संकल्प बळकट झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत